वाशीम,
bhalchandra-deshmukh : समाजकार्य अभ्यासक्रमाची बहुआयामी रचना विद्यार्थ्यांना शासकीय, अशासकीय तसेच स्वयंरोजगाराच्या विविध क्षेत्रांत सक्षम बनवणारी आहे. तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता मुळे नोकर्या कमी न होता समाजकार्य क्षेत्रात नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या समाजकार्य अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र देशमुख यांनी व्यक्त केला.
श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय, वाशीम येथे विद्यार्थी विकास विभाग, सांस्कृतिक विभाग व परीक्षा विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पदवी वितरण (दीक्षांत) समारंभात प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला श्री सरस्वती प्रगत विद्या प्रसारक मंडळाचे सचिव राहुल कोठारी यांची प्रमुख उपस्थिती होती. समारंभाच्या प्रारंभी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. यावेळी पदवी, पदव्युत्तर व आचार्य पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी समाजकार्य अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. संदीप शिंदे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात समाजकार्याच्या ज्ञानाचा प्रभावी उपयोग करून समस्यांवर मात करत स्वावलंबी बनण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विभागप्रमुख डॉ. संघरक्षित भदरगे यांनी शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी समाजाचे ज्ञानसंपन्न घटक बनले असून, त्यांनी आत्मसात केलेले ज्ञान व्यावहारिक जीवनात प्रभावीपणे वापरण्याची अपेक्षा व्यक्त केली.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अतुलकुमार राऊत होते. त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करताना विद्यार्थ्यांनी स्वतःचा, कुटुंबाचा, गावाचा व महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन केले. यावेळी गुणवंत विद्यार्थी गोपाल बिसडे यांने मनोगत व्यक्त केले, तर कु. ऋतुजा भोयर हिने कविता सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उद्धव बनकर यांनी केले. राष्ट्रगीताने समारंभाची सांगता झाली.