अग्रलेख...
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांतील सीमारेषा अतिशय धूसर असते. म्हणजे विचारपूर्वक स्वीकारलेला विश्वास; तर अंधश्रद्धा म्हणजे तर्क, पुराव्याशिवायचा आंधळा विश्वास. अंधश्रद्धेत माणूस कुणाच्या तरी आहारी जातो आणि श्रद्धावंत व्यक्ती श्रद्धेच्या पल्याड स्वयंभू असते. ती सश्रद्ध असतानाही विवेकी असते. श्रद्धा माणसाला नैतिक बळ देते, तर अंधश्रद्धा शोषणाचे कारण ठरते. Ashok Kharat अशोक खरात प्रकरणातील शोषण आणि त्याची व्याप्ती हे सारे पाहून अवाक् झाले आहेत. पण, हे असे इतक्या मोठ्या प्रमाणात घडत असताना आपण काय करीत असतो, हाही प्रश्न आहेच. सर्वसामान्य लोक नेहमीच सेलिब्रिटींचे, श्रीमंत-प्रभावशाली लोकांचे आणि राजकीय नेत्यांचे अनुकरण करीत असतात. एखादा मोठा नेता, सेलिब्रिटी किंवा उद्योगपती खरातसारख्या कथित आध्यात्मिक पुरुषाच्या चरणी श्रद्धा वाहताना दिसतो तेव्हा त्याचा प्रभाव नकळत समाजावर असतो. त्यामुळेच खरातसारखे भोंदूबाबा वर्षानुवर्षे समाजाला नासवीत असतात. इतिहासातही अशी उदाहरणे आहेतच. दरवर्षी अशा एका तरी भोंदूचे प्रकरण उघडकीस येत असते आणि तरीही आपले डोळे उघडत नाहीत, हाच आश्चर्याचा विषय आहे.
गेल्या दशकभरात महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील राज्यात भोंदूगिरीची दोनेक हजार प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आर्थिक फसवणूक, जादूटोणा, चमत्कारांच्या नावाखाली शोषण, अत्याचार अशा अनेक प्रकारांनी ठिकठिकाणचे भोंदूबाबा समाजाला पोखरत आहेत. नोंद न झालेल्या प्रकरणांची संख्या नोंद झालेल्या प्रकरणांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असणार. भीती, सामाजिक दबावामुळे लोक गप्प राहतात. त्यामुळे अशांचे काहीच बिघडत नाही. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कायदा आहे, असे म्हणतात. पण, तो आहे तर दिसत कसा नाही, असा प्रश्न हा प्रसंग आहे. खरात प्रकरणाची तक्रार बरीच आधी झाली होती. परंतु, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले, असे दिसते. अशाने काळ सोकावतो आणि खरातसारखे भोंदू तर जास्तच सोकावतात. इतिहासाची पाने उलटून पाहिली तर अंगावर काटा आणणारी अनेक उदाहरणे दिसतात. नरबळीची अघोरी प्रथा आणि गुप्तधनाच्या हव्यासापोटी निष्पाप बालकांचे बळी देण्याचे प्रकार आहेत. औषध देण्याच्या नावाखाली किंवा अंगात येण्याच्या प्रकारातून महिलांचे शोषण करण्यात आले. कधी चमत्काराचा बनाव करीत कुणी हवेतून साखळी काढली, तर कधी कुणी अंगारा देऊन कर्करोग बरा करण्याचा दावा केला. आजही देशात आणि राज्यात भोंदूगिरीच्या अनेक घटना घडताना आपण बघत आहोत. त्यातील अनेक घटना समाजाला हादरवून टाकणार्या ठरल्या आहेत. घटनांनी केवळ त्या व्यक्तींचे नुकसान होत नाही; तर समाजाच्या विवेकबुद्धीवर प्रश्नचिन्ह उभे होते. किरकोळ संकट पुढे आले तरी संयमाचे धागे उसवण्याचा हा काळ आहे. अशा काळात आपापल्या समस्येवर अल्प काळात उपाय शोधण्याच्या नादात भोंदूगिरीला सामाजिक बळ मिळते. भविष्य अज्ञात असते. खरे तर त्याच्या तशा असण्यातच मानवी जीवनाची गंमत आहे. काही लोक भविष्याची जास्त चिंता करीत अशा वाईट लोकांच्या डावपेचांना बळी पडतात. आजार, आर्थिक अडचणी, कौटुंबिक समस्यांमुळे माणूस खचतो आणि झटपट उपाय शोधण्याच्या नादात भोंदूगिरीच्या जाळ्यात अडकतो. हे रोखण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात अंधश्रद्धाविरोधी कायदा अस्तित्वात आहे. पण, केवळ कायदा करून समस्या सुटत नसतात. अनेक वेळा तक्रारी जात नाहीत, पुरावे मिळत नाहीत किंवा साक्षीदार पुढे येत नाहीत. काही प्रकरणांमध्ये राजकीय किंवा सामाजिक दबावामुळेही कारवाई होत नाही. परिणामी, दोषींना शिक्षा होत नाही आणि भोंदूगिरीला आळा बसत नाही. भोंदूगिरीवर नियंत्रण आणायचे असेल, तर कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी लागेल आणि त्यासाठी तक्रारींवर लगेच कारवाई करावी लागेल. सरकारी यंत्रणेकडून एवढीच आहे.
Ashok Kharat खरातसारखे भोंदूबाबा हे समाजातील अविवेकी आणि घाबरट संवर्गाचे अपत्य असतात. श्रद्धा बाळगता-बाळगता आपण अंधश्रद्ध होत आहोत, हेच अशा अनेकांना कळत नाही. अशी माणसं हळूहळू कर्मकांडात अडकवली जातात. मग खरातसारखे बाबा सांगतील ते करायला त्यांचे मन तयार होते आणि त्यातून अशा घटना घडतात. आजकालचे भोंदू तर हायटेक झाले आहेत. अनेक बाबा फेसबुक लाईव्ह आणि युट्यूबच्या माध्यमातून आपल्या शयनकक्षापर्यंत पोहोचले आहेत. भीती, अज्ञान आणि असहायता ही भोंदूबाबांना बळ देणारी ठरते. माणूस स्वतःच्या कष्टांवर, विचारांवर आणि प्रयत्नांवर विश्वास ठेवण्याऐवजी अशा बाबांच्या मागे लागतो तेव्हा फसवणूक होणे अपरिहार्य असते. सर्व आध्यात्मिक स्त्री-पुरुष खरातसारखे नसतात हे खरेच आहे. काही मंडळी आध्यात्मिक शिकवणुकीतून भले करीत आहेत, यात वाद नाही. पण खरातसारखे भोंदूही अनेक आहेत. व्यापक समाजहिताच्या दृष्टीने भोंदूंना रोखलेच पाहिजे. त्यांच्या हालचालींवर नजर ठेवली पाहिजे. भारतीय राज्यघटनेत नागरिकांच्या अधिकारांच्या तरतुदी आहेत, तशा नागरिकांच्या कर्तव्याच्याही आहेत. आपण अधिकारांबाबत नको तितके जागरूक. कर्तव्याच्या नावावर आनंद. घटनेतीलच एक तरतूद आहे वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याची व तो व्यापक प्रमाणात प्रसृत करण्याची. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील सीमारेषा इथेच महत्त्वाची ठरते. श्रद्धा ही नेहमी वैयक्तिक असते. ती जीवनातील अनिश्चिततेशी सामना करण्याची ताकद देते. पण अंधश्रद्धा ही सामाजिक समस्या बनते. ती विचारशक्ती गिळून टाकते आणि माणसाला इतरांच्या हातातील बाहुली बनवते. खरात प्रकरण हे त्याचे ताजे उदाहरण. महाराष्ट्र हे प्रगतिशील आहे. त्याला सुधारकी चळवळींचा इतिहास आणि वर्तमान आहे. सामाजिक परिवर्तनाच्या केंद्रस्थानी असलेले हे राज्य आहे. अशा राज्यात खरातसारखे समाजकंटक निर्माण होतात आणि त्यांचे शोषणाचे धंदे वर्षानुवर्षे बिनबोभाट चालत राहतात, हे अजिबात शोभणारे नाही. आज महाराष्ट्राच्या विकासाची गती प्रचंड आहे. पायाभूत सुविधांमध्ये मोठे बदल होत आहेत, गुंतवणूक वाढते आहे. शहरीकरण प्रमाणात होते आहे. पण समाजात अजूनही अंधश्रद्धा असेल आणि तिला कळत-नकळत पाठिंबा देणारे लोक असतील तर या प्रगतीत कुठेतरी न्यून आहे. कारण अशा घटनांचा परिणाम केवळ त्या व्यक्तींवर होत नाही, तर संपूर्ण समाजाच्या प्रतिमेवर होतो. राज्याच्या प्रतिमेवर परिणाम होतो. सर्वत्र एक प्रश्न निर्माण होतो की, जिथे इतकी प्रगती होते तिथे अजूनही अंधश्रद्धेला एवढे स्थान का?... यावर उपाय करायचे असतील तर सर्वप्रथम, शिक्षण पद्धतीत बदल आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना केवळ माहिती देणे पुरेसे नाही. त्यांना विचार करायला शिकवले पाहिजे. प्रश्न विचारणे, तर्क वापरणे आणि पुराव्यांवर विश्वास ठेवणे ही सवय लावली पाहिजे. जिज्ञासू आणि चिकित्सक बुद्धीचे विद्यार्थी घडवणे हा सर्वांत महत्त्वाचा आहे. कारण त्यातूनच भविष्यातले जागरूक नागरिक घडतील. वर्तमान दुरुस्त करण्यासाठी प्रसिद्ध व्यक्तींनी अंधश्रद्धेला कोणत्याही पद्धतीने प्रोत्साहन देणे थांबवले पाहिजे. माध्यमांनी अंधश्रद्धेचा भंडाफोड वेळच्या वेळी केलाच पाहिजे. आणि शेवटी येते ती प्रत्येक व्यक्तीची स्वतःची जबाबदारी. समोरची व्यक्ती कुणीही असली तरी श्रद्धेचा विषय येताच संशयाने पाहणे शिकले पाहिजे. संशयी मन असणे कमजोरी नसते. ती शहाणपणाची सुरुवात असते. असा शहाणपणा नसेल तर काय घडते, हे आपल्याला खरात प्रकरणात दिसून आलेलेच आहे. त्यामुळे आता तरी सर्वांनी जागे झाले पाहिजे. आपले श्रद्धांवत असणे आपली कमजोरी ठरता कामा नये. आपल्या श्रद्धेचा फायदा कुठल्याही भोंदूबाबाला उठविता येणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. आपल्या श्रद्धेतून आपल्याला मानसिक बळ प्राप्त होते ते अशा व्यक्तींच्या चिकित्सेसाठीही वापरले पाहिजे आणि सर्वांनी मिळून अंधश्रद्धा व त्यासाठी कारणीभूत असलेल्या सर्व घटकांचा नाश केला पाहिजे.