नागपूर,
increase-in-malnutrition : गर्भाच्या व बाळाच्या मेंदूच्या विकासाच्या महत्त्वाच्या काळात हवामान बदल व त्यामुळे कुपोषण गर्भवतींवर परिणाम करत असल्याचे आढळले असल्याचे ‘मातेचे पोषणविषयक प्राधान्यक्रम व समावेशक प्रारंभिक बाल्यावस्थेतील विकास’ विषयावरील कार्यशाळेत सांगण्यात आले.
युनिसेफ-इंडिया व पत्र सूचना कार्यालयातर्फे आयएमए सभागृहात आयोजित या क्षमता निर्मिती कार्यशाळेत तत्संबंधी चर्चा झाली. कुपोषणात हवामान बदल एक प्रमुख घटक असल्याचे युनिसेफ मानते. युनिसेफच्या ज्येष्ठ सल्लागार डॉ. मृदुला फडके यांनी सांगितले की, प्रारंभिक बाल्यावस्था विकासाच्या काळातील पोषणाचा अभाव गर्भावर परिणाम करतो. त्यामुळे गर्भातील जिवाला आयुष्यभरासाठी मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित गुंतागुंतीसारखे आजार जडण्याची स्थिती निर्माण होते.
एखादी गर्भवती आहारविषयक असुरक्षितता, ताण किंवा शारीरिकदृष्ट्या थकवणारे बाळंतपण यांना सामोरी जाते तेव्हा फक्त तिच्याच आरोग्याला धोका निर्माण होतो असे नव्हे तर तिच्या बाळाचे आरोग्य आयुष्यभरासाठी धोक्यात येऊ शकते.
सेवाग्रामच्या महात्मा गांधी वैद्यकीय संस्थेचे डॉ. सुबोध गुप्ता यांनी सांगितले की, गर्भावस्थेच्या प्रारंभिक काळातील पोषण व काळजीने बाळाच्या मेंदूच्या विकासाला चालना मिळते. पोषण, ईसीडी, हवामानविषयक असुरक्षितता व असंसर्गजन्य आजार हे परस्परांशी जोडलेले आहेत. ते गर्भधारणेच्या आधी सुरू होतात व गर्भधारणेच्या पहिल्या 1 हजार दिवसांमध्ये वेगाने विकसित होतात.
गर्भाचा व गर्भावस्थेतील बाळाच्या अगदी सुरुवातीच्या काळात बाळाच्या शरिराच्या चयापचयाची प्रक्रिया निश्चित होते. या टप्प्यात कमी पोषण मिळाले तर बाळाच्या आयुष्यात नंतरच्या काळात लठ्ठपणा, इन्सुलिन प्रतिकार तसेच टाईप 2 प्रकारचा मधुमेह, उच्च रक्तदाब व हृदयरोग, मानसिक आजार होण्याची शक्यता बळावते.
महाराष्ट्रात बाल्यावस्थेतील असंसर्गजन्य आजार वेगाने वाढत असून त्याचा परिणाम 60 लाखांहून अधिक मुलांवर होतो आहे. मधुमेह, दमा, जन्मजात हृदयरोग, सिकल सेल, स्थूलता मुलांमध्ये वाढत आहेत, असे युनिसेफचे आरोग्य विशेषज्ञ डॉ. मंगेश गदारी यांनी सांगितले.
मुलांमधील आजार लवकर ओळखून उपचार केल्याने बालमृत्यूचे प्रमाण कमी होते. मेंदूच्या विकासात बाधा येत नाही. भविष्यातील एनसीडीचा धोका कमी होतो, असे युनिसेफ महाराष्ट्र प्रमुख संजय सिंह यांनी सांगितले.
ही कार्यशाळा प्रत्येक गर्भवतीला तिच्या बाळाच्या आयुष्याची सर्वोत्तम सुरुवात करून देण्यासाठी आवश्यक पोषण, निगा व संरक्षण मिळावे यासाठी भारत सरकारची बांधिलकी अधोरेखित होते, असे पत्र सूचना कार्यालयाच्या पश्चिम विभाग महासंचालिका स्मिता वत्स-शर्मा यांनी सांगितले. उपसंचालक जयदेवी पुजारी स्वामी यांनी फॅक्ट चेेक उपक्रमाची माहिती दिली.