विवाहित महिलेने सहमतीने ठेवलेल्या संबंधाला लैंगिक अत्याचार म्हणता येणार नाही !

25 Mar 2026 16:29:25
अनिल कांबळे
नागपूर,
FIR in rape case cancelled विवाहित महिलेने आपल्या सहमतीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले. काही महिन्यांनंतर तिने लैंगिक शाेषण केल्याची तक्रार दिली. दाेघांमध्ये दीर्घकाळ संबंध हाेते आणि महिला प्राैढ व विवाहित असून तिने अनेक वेळा आराेपीसाेबत हाॅटेल व लाॅजमध्ये भेटी दिल्या आहेत. तक्रार उशिरा दाखल करण्याचे समाधानकारक कारण देण्यात आलेले नाही. त्यामुळे या प्रकरणात सहमतीने संबंध ठेवल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसत असल्याने लैंगिक अत्याचार झाला असे म्हणता येणार नाही. त्यामुळे आराेपीविरुद्ध दाखल गुन्हा रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. न्यायमूर्ती उर्मिला जाेशी-वाळके यांच्या समक्ष ही सुनावणी झाली. बेलतराेडीत राहणारी पीडित 24 वर्षीय वैशाली (काल्पनिक नाव) महिला उच्चशिक्षित असून ती 2024 मध्ये मिहानमधील एका कंपनीत नाेकरी करीत हाेती. तिचे पती छत्तीसगढमधील एका खासगी कंपनीत नाेकरीला हाेते. यादरम्यान तिची ओळख कार्यालयातील सहकारी देव आशिष याच्याशी झाली.
 
 

FIR in rape 
 
काही दिवसांतच मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. ऑगस्ट 2024 मध्ये देव आणि वैशाली हे दाेघेही एमआयडीसी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील आयसी चाैकात असलेल्या एका लाॅजवर गेले. तेथे दाेघांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच नाेव्हेंबर 2024 मध्येसुद्धा दाेघांनीही लाॅजवर जाऊन संबंध ठेवले. काही महिन्यांनंतर दाेघांच्या प्रेमसंबंधाची कुणकुण लागली. पतीला संशय आल्याने त्याने देवलाफोन केला आणि काही रक्कम आणि स्टँप पेपरची मागणी करीत धमकी दिल्याचा आराेप देवने केला. त्याची लेखी तक्रार अजनी पाेलिस ठाण्यात केली. पतीविरुद्ध तक्रार दिल्याच्या पाच दिवसांनंतर वैशालीने एमआयडीसी पाेलिस ठाण्यात देव विरुद्ध लैंगिक शाेषनाची तक्रार दिली. एमआयडीसी पाेलिसांनी देव विरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी देव याने अ‍ॅड. प्रणित वैरागडे यांच्यार्माफत गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली.
 
 
बदला घेण्याचा हेतू!
वैशालीच्या पतीविरुद्ध तक्रार दिल्यामुळे बदला घेण्याच्या उद्देशाने वैशालीने देव विरुद्ध लैंगिक शाेषण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. वैशाली आणि देव यांचे प्रेमसंबंध हाेते आणि दाेघांनी सहमतीने शारीरिक संबंध ठेवले हाेते, अशी बाजू देवचे वकील अ‍ॅड. प्रणित वैरागडे यांनी मांडली. न्यायालयाने दाेन्ही बाजू ऐकून घेत देव याच्यावरील दाखल गुन्हा रद्द करण्याचा आदेश दिला.
 
Powered By Sangraha 9.0