हिंगणघाट,
fire-at-p-v-textile-company : नजिकच्या जाम येथील पी. व्ही. टेक्स्टटाईल कंपनीमध्ये मंगळवार २४ रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. मशीनमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
कापसापासून धागा निर्मिती करणार्या या कंपनीत अचानक लागलेल्या आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच हिंगणघाट व वर्धा नगर पालिकांच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळविले. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. दरम्यान, कंपनीमध्ये अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर आग लागल्यामुळे आश्चर्य व्यत करण्यात येत आहे. त्यामुळे कंपनीतील अग्निसुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित यंत्रणा सदोष असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आगीचे स्वरूप मोठे असल्याने कापसाच्या गाठी व तयार मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.