महागाव तालुक्यात पेट्रोलपंपांवर वाहनधारकांची गर्दी

25 Mar 2026 20:09:52
तभा वृत्तसेवा
महागाव, 
crowd-petrol-pumps : तालुक्यातील इंधन साठा संपुष्टात आल्याच्या चर्चेने वाहनधारकांनी आपल्या वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी बुधवार, 25मार्च रोजी सकाळपासूनच पेट्रोलपंपावर गर्दी केली असल्याचे चित्र दिसत होते. इराण इस्राइल युद्धाच्या परिणामामुळे इंधन तुटवडा झाला असून तालुक्यातील पेट्रोलपंपावर कमी इंधनसाठा उपलब्ध असल्यामुळे तो केव्हाही संपू शकतो या चर्चेमुळे तालुक्यातील वाहनधारकांनी बुधवार सकाळपासूनच महागाव शहरासह तालुक्यातील धनोडा, खडका, गुंज, दहिसावळी, काळी (दौ), काळी (टें) येथील पेट्रोल पंपांवर अचानक गर्दी केली.
 

y25March-Mahagav 
 
 
 
यामुळे पेट्रोल पंप चालकाची चांगलीच भंबेरी उडाली. या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागली. परंतु आजही तालुक्यातील सर्वच इंधन कंपन्यांच्या पेट्रोप पंपांवर मुबलक इंधनसाठा उपलब्ध असल्याची माहिती देऊन नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून पेट्रोलपंपावर गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
 
सध्या शासन किंवा तेल कंपन्यांकडून इंधन तुटवडा अथवा पुरवठा खंडित होण्याबाबत कोणतीही अधिकृत सूचना नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व शांतता राखावी. विनाकारण पेट्रोल पंपांवर गर्दी करणे टाळावे, कारण त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सर्वांनी जबाबदार नागरिक म्हणून सहकार्य करावे.
- अभय मस्के
तहसीलदार महागाव
पोलिस संरक्षणात विक्री
 
 
महागावातील तीनपैकी दोन पेट्रोल पंपांवरील पेट्रोल व डिझेलचा साठा संपल्याने केवळ शहरातील नाईक पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल विक्री सुरू होती. परंतु दोन पेट्रोल पंप साठ्याअभावी बंद झाल्याने वाहनधारकांनी चालू असलेल्या नाईक पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केल्याने येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये व वाहनधारकांना सुरळीत पेट्रोल, डिझेल पुरवठा व्हावा याकरिता महागाव पोलिस ठाणेदार धनराज निळे यांनी या ठिकाणी पोलिस नेमून परिस्थितीवर नियंत्रण ठेवले.
Powered By Sangraha 9.0