एकता कपूरचा नवा चित्रपट ‘द टेरर रिपोर्ट’

25 Mar 2026 10:43:58
मुंबई,
new film The Terror Report ‘द साबरमती रिपोर्ट’च्या यशानंतर निर्माती एकता कपूर पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर एक नवा आणि वेगळा चित्रपट घेऊन येत आहेत. या नव्या प्रकल्पाचे नाव ‘द टेरर रिपोर्ट’ असून तो एक मोठा राजकीय थरारपट असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विष्णूवर्धन करणार आहेत, ज्यांनी यापूर्वी ‘शेरशाह’ सारख्या चित्रपटातून आपली वेगळी छाप उमटवली आहे. या चित्रपटाची निर्मिती बालाजी टेलिफिल्म्स आणि एलिप्सिस एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त सहकार्याने होत आहे. ‘द टेरर रिपोर्ट’ हा खऱ्या घटनांवर आधारित असून भारतातील दहशतवादी हल्ल्यांचा इतिहास आणि त्याविरुद्ध देशाने दिलेल्या प्रत्युत्तरांचा आढावा घेणारा असेल, अशी माहिती समोर आली आहे. चित्रपटात तपासयंत्रणा, गुप्तचर कारवाया आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित घटनांचे सखोल चित्रण पाहायला मिळणार आहे.
 
 
Lockdown
 
निर्मात्यांच्या मते, हा प्रकल्प केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता प्रेक्षकांमध्ये देशाच्या सुरक्षेबाबत आणि दहशतवादाविरोधातील लढ्याबाबत जागरूकता निर्माण करेल. विविध प्रस्थापित निर्माते आणि कलाकारांच्या सहभागामुळे या चित्रपटाबाबत अपेक्षा वाढल्या आहेत. ‘द साबरमती रिपोर्ट’मध्ये दिसलेली कथा पुढे नेत हा नवीन चित्रपट अधिक व्यापक आणि गंभीर विषय मांडणार आहे.दरम्यान, ‘द साबरमती रिपोर्ट’मध्ये विक्रांत मेस्सी, राशी खन्ना आणि रिद्धी डोगरा यांच्या भूमिका होत्या. २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला काही राज्यांमध्ये करमाफी मिळाली होती आणि त्यावरून बराच वादही निर्माण झाला होता. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात, हरियाणा आणि ओडिशा या राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला होता. आता ‘द टेरर रिपोर्ट’बाबत अधिक माहिती, चित्रीकरणाची सुरुवात आणि प्रदर्शनाची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रेक्षकांमध्ये या नव्या प्रकल्पाबाबत उत्सुकता निर्माण झाली असून, हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत येण्याची चिन्हे दिसत आहेत.
Powered By Sangraha 9.0