चिखली,
sharad-bhala : तरूण भारत वृत्तपत्राचा बालपणापासून वाचक आहे. जेष्ठ विचारवंत संपादक लेखक मा. गो. वैद्य यांचे लेख तसेच भाष्य नावाचे सदर आर्वजून वाचले आहे. त्यांचे लेखाचे कात्रण आजही संग्रही आहेत. वाचक आणि वाचन संस्कृती जोपासणारे सेवाव्रती वृत्तपत्र तरूण भारत ने वेगळी ओळख निर्माण केली आहे. अकोला आवृत्ती वर्धापन दिनानिमित्त प्रकाशित झालेला सेवाव्रत विशेषांक वाचनीय असल्याचे प्रतिपादन चिखली तालुका संघचालक शरद भाला यांनी केले.
चिखली येथे अंबिका अर्बनच्या सभागृहात अकोला वर्धापन दिनानिमित्त प्रकाशित विशेषाकांचे प्रकाशन दि. २५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चिखली तालुका संघचालक शरद भाला, प्रमुख अतिथी भाजपचे नगराध्यक्ष पंडितराव देशमुख, अंबिका अर्बनचे संस्थापक अॅड. विजयकुमार कोठारी, शिप्र मंडळाचे प्रेमराज भाला, अंकुशराव पडघान, प्राचार्य डॉ. निलेश गावंडे, तसेच अकोला आवृत्ती समन्वयक निलेश जोशी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी दिपप्रज्वलन, भारत माता पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्वागतानंतर विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा देत शेजारी राहणार्या अॅड. महाजन यांच्या घरी इयत्ता पाचव्या वर्गात असतांना तरूण भारत वाचायला जात होतो. वाचनामुळे वैचारिक व बौद्धिक ज्ञान प्राप्त झाले. गेल्या ६० वर्षात नियमित तरूण भारत आर्वजून वाचतो. तरूण भारतचा शताब्दी वर्ष निमित्त अकोला आवृत्तीचा सेवाव्रत विशेषांक प्रकाशनाचा मान मिळाल्याचा मनस्वी आनंद त्यानी व्यक्त केला.
विशेषकांच्या प्रकाशनाला शुभेच्छा देऊन शिवाजी महाविद्यालयात नोकरी करीत असतांना तरूण भारत वृत्तपत्राशी वाचक या नात्याने नाळ जुळल्याचे प्राचार्य डॉ. निलेश गावंडे यांनी आपल्या मनोगतात भावना व्यक्त केल्या. अंकुशराव पडघान यांनी तरूण भारतचा वाचक हा चोखंदळ वैचारिक सामाजाचे भान ठेऊन राष्ट्रहितासाठी तन मन धनाने सर्वस्व अर्पण करणारा आहे. बालपणी माझ्या काकाकडे तरूण भारत वाचण्यासाठी नियमित जात होतो. वाचनाची आवड निर्माण झाल्याने नियमित तरूण भारत वाचनाची सवय झाल्याचे त्यांनी आर्वजून सांगितले.
अकोला आवृती समन्वयक निलेश जोशी यांनी तरूण भारत शताब्दी वर्ष तसेच नरकेसरी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंचसुत्री वर आधारित पर्यावरण स्वच्छता हा उपक्रम संपूर्ण विदर्भात सर्व समाजाच्या सेवाकार्यातून यशस्वीपणे राबविण्यात आल्याची सविस्तर माहिती मनोगतात दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खामगाव जिल्हा प्रतिनिधी विजय कुळकर्णी परिचय चिखली तालुका प्रतिनिधी पवन लढ्ढा, सुत्रसंचलन प्राचार्य प्रमोद ठोंबरे, आभार प्रदर्शन बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नितीन शिरसाट यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला वाशिम जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत लोहाणा, पुरवणी संयोजक कैलास खांडेभराड, जळगाव जामोदचे प्रतिनिधी अमोल भगत, मगरूळनाथ प्रतिनिधी सुधाकर क्षिरसागर, अरविंद आसोलकर, रामदास निमावत, सुनिल लाहोटी, सुदर्शन भालेराव, सत्यनारायण लढ्ढा, सुरेंद्र पांडे, आशिष लढ्ढा, शैलेश बाहेती, सुहास शेटे, प्राचार्य गवले, प्राचार्य गव्हाणे यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तरूण भारतचे वाचक हितचिंतक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता क्रिडा प्रतिनिधी रविंद्र गणेशे यांनी सादर केलेल्या पसायदानने करण्यात आली.