‘सोमय्या’ची महिन्याभरात दुसर्‍या विश्वविक्रमाची तयारी!

25 Mar 2026 19:17:45
चंद्रपूर, 
pandurang-ambatkar : अवघ्या जगात सद्यस्थितीत युद्धजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे महागाई आणि राजकीय अस्थिरतेचे सावटही आहे. अशा वेळी अवघ्या जगाला शांतीचा संदेश देण्यासाठी चंद्रपूरातील सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स सज्ज झाला आहे. येत्या शनिवार, 28 मार्च रोजी वडगाव येथील संस्थेच्या परिसरात किमान 1500 विद्यार्थ्यांच्या सहभागातून जगातील सर्वात मोठे मानवी ‘जागतिक शांतता चिन्ह’ साकारले जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग आंबटकर यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.
 

CHAN 
 
 
 
या अभूतपूर्व उपक्रमाची नोंद थेट ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये करण्यासाठी संस्थेने कंबर आता कसली आहे. विशेष म्हणजे, हा कार्यक्रम जगातील सुमारे 180 देशांमध्ये प्रसारित केला जाणार असून, चंद्रपूरचे नाव जागतिक नकाशावर पुन्हा एकदा झळकणार आहे. कारण सोमय्या ग्रुपने 1 मार्च 2026 रोजीच उत्कृष्ट महिला मंच सोबत एक विश्वविक्रम केला. तब्बल 2700 महिला व विद्यार्थिनींच्या सहभागातून अवघ्या 7 मिनिटांत 20 लावण्यांचे सादरीकरण करून हा विक्रम प्रस्थापित केला गेला. त्यांनतर एका महिन्यात दुसरा विश्वविक्रम प्रस्थापित करण्याच्या उंबरठ्यावर ही संस्था उभी आहे.
 
 
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढता तणाव आणि संभाव्य तिसर्‍या महायुद्धाच्या भीतीने जग ग्रासलेले असताना, चंद्रपूरचे विद्यार्थी शांततेसाठी एकत्र येणार आहेत. हा उपक्रम केवळ एक विक्रम नसून, ती मानवतेची एकता आणि सहअस्तित्वाची हाक आहे. चंद्रपुरातून जाणारा हा शांततेचा संदेश संपूर्ण जगाला प्रेरणा देईल, असे आंबटकर यांनी बुधवारी आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.
Powered By Sangraha 9.0