नवी दिल्ली,
.Petrol-diesel supply smooth मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातील इंधन पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या चिंतेवर केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका मांडत नागरिकांना दिलासा दिला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, देशात कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असून सर्व शुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही आणि दरवाढीचीही शक्यता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वसायिक गॅसचे वाटप सुरू
गेल्या काही दिवसांत काही ठिकाणी नागरिकांनी घाबरून मोठ्या प्रमाणात इंधन खरेदी केल्यामुळे पेट्रोल पंपांवर रांगा दिसून आल्या होत्या. मात्र, ही परिस्थिती तात्पुरती असून देशात कोणत्याही प्रकारचा तुटवडा नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. पेट्रोलियम साठवण केंद्रांमध्येही पुरेसा साठा असल्याने पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे सांगण्यात आले. एलपीजी गॅसबाबतही सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. व्यावसायिक वापरासाठी गॅसचे प्रमाण वाढवण्यात आले असून हॉटेल्स, ढाबे, औद्योगिक कॅन्टीन आणि स्थलांतरित कामगारांना प्राधान्य देण्याच्या सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत. देशभरात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक गॅसचे वाटप करण्यात आले असून घरगुती गॅसच्या उपलब्धतेवर कोणताही परिणाम झालेला नाही. सिलिंडरचे बुकिंग आणि वितरणही पूर्ववत सुरू असल्याचे सांगण्यात आले.
याशिवाय, घरगुती गॅसऐवजी पाईपद्वारे गॅस वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून विशेष उपाययोजना राबवण्यात येत आहेत. नवीन जोडण्या देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून अल्प कालावधीत मोठ्या संख्येने ग्राहकांनी या सुविधेकडे वळण्यास सुरुवात केली आहे. वाहनांसाठीही गॅसचा पुरवठा पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यात आला आहे. एकूणच, देशात इंधन किंवा गॅसबाबत कोणतीही कमतरता नसल्याचे सरकारने स्पष्ट करत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि नेहमीप्रमाणेच व्यवहार करावेत, असे आवाहन केले आहे.