गोंदिया जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेल पंप रिकामे (video)

25 Mar 2026 11:47:16
गोंदिया, 
petrol pumps in gondia काही सोशल मीडिया ग्रुप्समध्ये जिल्ह्यातील पेट्रोल पंपातील पेट्रोल संपल्याची अफवा पसरल्यामुळे वाहन चालकांमध्ये एकच धावपळ माजली, त्यामुळे नागरिकांनी काल २४ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास व आज, बुधवारी २५ मार्च रोजी पहाटेपासून पेट्रोल आणि डिझेल पंपांवर प्रचंड गर्दी केल्याचे दिसून आले. परिणामी आज सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेलचा साठा संपल्याचे फलक पेट्रोल पंपावर लागल्याचे दिसून आले. दरम्यान जिल्ह्यात इंधन साठाची कुठलीही कमतरता नसून नागरिकांनी संयम बाळगावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
 

petrol pump 
 
 
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोलियम उत्पादने आणि गॅसचा पुरवठा काही प्रमाणात विस्कळीत झाला आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने स्वयंपाकाच्या गॅसचा समावेश आहे. तथापि, आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलसारख्या पेट्रोलियम उत्पादनांवर याचा परिणाम दिसून आला नव्हता. मात्र, २४ मार्च रोजी, काही सोशल मीडिया ग्रुप्सवर पेट्रोल उपलब्ध नसल्याची किंवा त्याचा तुटवडा होत असून किमती वाढणार असल्याच्या अफवा पसरल्याने दुपारनंतर पेट्रोल पंपांवर चालकांच्या लांबच लांब रांगा लागू लागल्या. त्यात रात्रीच्या सुमारास पेट्रोल भरण्यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने पेट्रोल पंपांवर गर्दी केली. बुधवारी पहाटेपासून वाहनचालकांनी आपल्या वाहनांसह पेट्रोल पंपावर एकच गर्दी केली. अफवेवर विश्वास ठेवून जे लोक १०० रुपयांना पेट्रोल भरायचे, ते आता ५०० ते १ हजार रुपयांपर्यंत इंधन भरू लागल्याने पेट्रोल-डिझेलचा तुटवडा होत सकाळी साडेदहा वाजता पर्यंत जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपातील पेट्रोल डिझेलचा साठा संपल्याचे चित्र पहावयास मिळले.
 
जिल्ह्यात ८२ पेट्रोल पंप...
गोंदिया जिल्ह्यात पाच कंपन्यांचे ८२ पेट्रोल पंप असून शहर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात सुमारे २० पेट्रोल पंप आहेत. या पेट्रोल पंपांमध्ये प्रामुख्याने इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम, रिलायन्स, नायरा एनर्जी लिमिटेड, भारत पेट्रोलियम यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे.
 
अशी पसरली अफवा...!
मिळालेल्या माहितीनुसार आखाती युद्धापूर्वी, पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल पंप मालकांना ठराविक कालावधीसाठी सवलतीवर पेट्रोल - डिझेलचा पुरवठा करत असत, ज्यामुळे त्यांना आपला व्यवसाय सुरळीत चालू ठेवता येत असे.petrol pumps in gondia मात्र, आखाती युद्धामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी रोख रक्कम आणि आगाऊ रक्कम घेऊन इंधन पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काही पेट्रोल पंप मालक पैसे भरण्यास असमर्थ ठरले, परिणामी त्यांना पेट्रोल व डिझेलचा साठा पुरवठा होऊ शकला नाही. यावर काहींनी पेट्रोल आणि डिझेल संपल्याची अफवा पसरवली.
 
 
 
जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका....
गोंदिया जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजी गॅसचा तुटवडा नाही, या सर्वांचा मुबलक साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवेवर विश्वास ठेवू नये. जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर तेच राहणार असून, व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठाही लवकरच सुरळीत केला जाईल. अफवा पसरवणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल.
- प्रजित नायर, जिल्हादंडाधिकारी, गोंदिया
Powered By Sangraha 9.0