रामनवमी शाेभायात्रा : शहरात 4500 हून अधिक पाेलिस तैनात

25 Mar 2026 21:27:15
अनिल कांबळे,
नागपूर, 
ram-navami-procession : रामनवमी सणाच्या पृष्टभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पाेलिस प्रशासनाने कडेकाेट सुरक्षा व्यवस्थेचे नियाेजन केले आहे. नागरिकांना निर्भय वातावरणात सण साजरा करता यावा यासाठी संपूर्ण शहरात सुरक्षा कवच उभारण्यात आले आहे. याच अनुषंगाने बाॅम्ब शाेधक पथकाकडून विविध ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवून सखाेल तपासणी करण्यात आली.
 

Navinchandra-Reddi-IPS 
 
 
 
सहपाेलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनवमीसाठी विशेष सुरक्षा याेजना आखण्यात आली आहे. ड्राेन उडविण्यासाठी पाेलिसांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले असून, परवानगीशिवाय ड्राेन उडविल्यास कठाेर कारवाई करण्यात येणार आहे. शहरात एकूण 4500 हून पाेलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यामध्ये सुमारे 3000 महिला व पुरुष पाेलिस प्रत्यक्ष बंदाेबस्तावर असतील, तर 400 अधिकारी बंदाेबस्ताची कमान सांभाळणार आहेत.
 
 
राज्य सुरक्षा पाेलिस सज्ज
 
 
सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी राज्य राखीव पाेलिस दल (एसआरपी)च्या तुकड्या संवेदनशील भागात तैनात राहणार आहेत. काेणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामाेरे जाण्यासाठी दंगा नियंत्रण पथकाला सतर्क ठेवण्यात आले आहे. बाॅम्ब शाेधक पथक, तसेच इमारतींवरून देखरेख ठेवणारे जवानही तैनात असतील. याशिवाय साध्या वेशातील पाेलिस व महिला कर्मचारी देखील विविध ठिकाणी तैनात राहणार असून, काही पाेलीस दल नियंत्रण कक्ष व मुख्यालयात राखीव ठेवण्यात आले आहे. सुमारे 1000 हाेमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.
Powered By Sangraha 9.0