पराग मगर,
नागपूर
vasudev-kamat : रामायण ही केवळ कथा नाही तर ती एक संस्कार कथा आहे. आपल्या जीवनीतील नीतीमुल्य त्यात प्रतिबिंबत झाले असून रामकथेतील प्रत्येक प्रसंग हा संस्कार देणारा आहे. ताे प्रत्यक्ष जीवनात उतरविणे आजच्या काळात आवश्यक असल्याचे आग्रही प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार पद्मश्री वासुदेव कामत यांनी केले.
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, पश्चिम नागपूर नागरिक संघ व संस्कार भारतीच्या वतीने रामनगर येथील श्रीराम मंदिराच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार पद्मश्री वासुदेव कामत यांच्या ‘मर्यादा पुरुषाेत्तम श्रीराम’ या विशेष चित्र संवाद कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाद्वारे त्यांच्या कुंचल्यातून साकारलेले प्रभू श्रीरामांचे चैतन्यमयी आणि प्रभावी चित्रमय चरित्र अनुभवण्याची संधी नागरिकांना मिळाली.
चित्रां चा प्रवास उलगडताना कामत म्हणाले, प्रत्येक ललित कलेला रामायणाचा स्पर्श झालेला आहे. त्यामुळे चित्रांतून काय वेगळं दाखविणार हा प्रश्न मनात हाेता. अशा वेळी खारूताईची कथा आठविली आणि रामकथांतील संस्कार चित्रांतून दाखविताना आपणही खारीचा वाटा उचलायचा या भावनेतून या चित्रप्रवासाला सुरुवात झाल्याचे ते यावेळी म्हणाले. बालपणी आजीने, आईने सांगितलेल्या वाल्मिकी रामायणातील कथा, रामचरितमानस आणि गीतरामायण या चित्रां मागील प्रेरणा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हनुमंताच्या हृदयातून रामकथेचे दर्शन
पहिल्या कारसेवेत सहभागी झालेल्यांचा सत्कार कार्यक्रमात एक वृद्ध महिला म्हणाली ‘राममदिरासाठी आधी हनुमंताचे मंदिर बांधा.’ हे वाक्य डाेक्यात घुमले आणि ज्याच्या हृदयात राम वसलेले आहेत त्या हनुमंताच्या हृदयात शिरून हाेणाèया रामाच्या दर्शनाच्या चित्राने या मालिकेला सुरुवात केली. याच प्रेरणेतून पुढे संस्कार, भावना आणि मूल्य पाेचवणारी श्रावण बाळाची कथा, ठुमक चलत राम चंद्र, रामचंद्रदर्शन, शिवराम, शैलशीला अहल्या अशी अनेक विषयावरील चित्रांचे वर्णन करीत त्यामागील विचारप्रक्रिया त्यांनी यावेळी विषद केली. प्रास्ताविक आशुताेष अडाेणी यांनी केले.
ही सगळी भावचित्र
कामत यावेळी म्हणाले, ही सगळी प्रसंगचित्रे नाहीत तर ती भावचित्रे आहेत. वेदनेशिवाय कुठलीच कला अंकुरीत हाेत नाही. आनंद वरवरचा असताे. वेदना जाणवत राहते. क्राैचवध, श्रावणबाळाच्या आईवडिलांचा विलाप, अहल्या प्रसंग आदींतून ही वेदना दाखविण्याचा मी प्रयत्न केला. आपण चित्र पाहताे. पण चित्र ही वाचायची असतात. असे ते म्हणाले.