इंधन तुटवड्याच्या अफवेने वाहनधारकांची तारांबळ

25 Mar 2026 18:25:08
वाशीम, 
fuel-shortage-rumors : अखाती देशातील युध्दस्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या अफवामुळे पेट्रोल पंपावर वाहनधारकांची एकच तारांबळ उडाली असून, वाहनात पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर वाहनधारकांची एकच गर्दी दिसून आली असली तरी जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सबंधित विभागाने स्पष्ट केले आहे.
 
 
JK
 
 
 
अमेरिका - इराण युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या असून, इतर देशातून येणारे कच्चे तेलाचा तुटवडा होवून आता इंधन मिळणार नाही, अशी भिती वाहनधारकांच्या मनात निर्माण झाल्याने आपल्या वाहना बसेल तेवढे इंधन भरण्यासाठी वाहनधारकांची एकच झुंबड उडाल्याचे शहरातील काही पेट्रोल पंपावर दिसून आले. तर काही पेट्रोल पंपावरील साठा संपल्याने त्याठिकाणचे वितरण बंद होते. इंधन पुरवठादार कंपन्यांनी नविन नियम लागू केले असून, इंधर टँकर पाहीजे असल्यास त्यासाठी आगाऊ रक्कम भरावी लागणार आहे. इंधन विक्रेत्यांनी आगाऊ रक्कम भरली तरच त्यांना पेट्रोल डिझेल मिळणार आहे.
 
 
मात्र, काही पेट्रोल पंप चालक आगाऊ रक्कम भरण्यास धजावत नसल्याने त्यांना इंधनाचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे काही पेट्रोल पंपावर तुटवडा निर्माण झाला तर काही पेट्रोल पंप संचालकांनी पेट्रोल - डिझेल नसल्याचे फलक लावल्याने वाहनधारकात संभ्रम निर्माण झाला आहे.
 
 
शहरातील काही पेट्रोल पंपावरील साठा संपल्याने वाहनधारकांनी इतर ठिकाणी आपला मोर्चा वळविला आहे. त्यामुळे काही पेट्रोल पंपावर गर्दी वाढली आहे. जिल्ह्यात कुठेही इंधन तुटवडा नाही. मात्र, पुरवठादार कंपन्याच्या नविन नियमामुळे टँकर पोहोचण्यास विलंब होत आहे. त्यामुळे काही अंशी इंधनाचा तुटवडा जाणवत आहे. जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून, वाहनधारकांनी कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Powered By Sangraha 9.0