वाशीम,
shri-ram-navami : येथील पुरातन असलेले श्रीराम मंदीरात श्रीराम नवमी उत्सवाची जय्यत तयारी सुरु असून, यानिमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम नवमीच्या मुख्य दिवशी श्रींना अभिषेक, पूजा, अर्चा व त्यानंतर शहरातून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कार्यकारी विश्वस्त अॅड. भवानीपंत उर्फ पुष्कर ज्ञानेश्वर काळू यांनी दिली.
शहराच्या मध्यभागी असलेले श्रीराम मंदीरात श्रीराम नवमीच्या दिवशी भक्तांची मांदीयाळी असते. श्री बालाजी संस्थानलगत हे श्रीराम मंदीर आहे. लगतच शनिदेवाचे मंदीर आहे. श्रीराम नवमीचे औचित्य साधून मंदिराची सजावट करण्यात आली आहे. संस्थानच्या वतीने श्रीराम नवमी उत्सव, गोकुळाष्टमी, दिवाळी पाडवा उत्सव मोठ्या थाटात साजरे करण्यात येतात.
इ. स. १९१० च्या सेंट्रल प्रोव्हीएन्स अॅन्ड बेरार डिस्ट्रीक गॅझेटीयर नुसार वाशीमचे श्रीराम मंदीर हे साधारण २०० वर्ष जुने असून, अमवानदास महाराज बैरागी याने बांधले असे म्हटले जाते. देवस्थानचे व्यवस्थापन तेव्हाचा चेला रामानुजदास बैरागी याचेकडे होते. या देवस्थानला ११०० रुपये जहागीरीचे उत्पन्न होते. त्यातुन देवस्थान खर्च चालत असे. इ. स. १९२६ मध्ये विष्णुदास गुरू रामानुजदास याचे विरूध्द चाललेल्या मु.नं. ४/१९२६ च्या हूकुमनाम्यानुसार अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश अकोला यांनी नेमलेल्या विश्वस्तांची सभा १३ ऑटोबर १९३१ रोजी संपन्न होवून त्यामध्ये बाबासाहेब उपाख्य कृष्णराव यशवंतराव काळू (वहिवाटदार श्री बालाजी संस्थान वाशीम) यांना कार्यकारी मंडळाचे पदसिध्द अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवडण्यात आले. त्यांच्या कार्यकाळात नविन देवळाचे बांधकाम काम पूर्ण होवून त्यांच्या शुभ हस्ते नविन मंदिरात १४ एप्रिल १९४३ रोजी सुर्योदयी पुष्य नक्षत्रावर (श्रीराम पंचायतन) श्रीराम, सिता, लक्ष्मण, भरत, शस्त्रुघ्न व इतर देवतांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
त्यांच्या कार्यकुशल धोरणामुळे संस्थानच्या मालकीच्या शेत जमिनींना इ. स. १९६४ मध्ये शासनाचे कुळ सुट्टीचे प्रमाणपत्र प्राप्त झाले, त्यांच्या संकल्पनेतून संस्थान मध्ये हरीरामजी मयारामजी डागा यांचे देणगीतून धर्मशाळा तसेच संस्थानच्या मालकीच्या स. न. ३३१ या शेताच्या पश्चिम धुर्यावर संस्थानच्या मालकीची दुमजली इमारत बांधण्यात आली (हल्ली येथे सोमाणी रेडीमेड व इतर दुकाने मासिक भाड्याने आहेत). त्यांचे देहावसान ९ ऑटोबर १९७४ रोजी त्यांचे राहते घर श्री बालाजी संस्थान वाशीम येथे झाले.
पुर्वी श्री बालाजी संस्थान मधून ह्या देवस्थानाच्या बैराग्याला आठवडी किंवा मासिकी म्हणून दिले जायचे. बाबासाहेब उपाख्य कृष्णराव यशवंतराव काळू यांच्या सोबत त्यांचे सुपुत्र भाउसाहेब उपाख्य नारायणराव कृष्णराव काळू हे इ. स. १९७१ पासून जनरल बॉडीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांनी देखील संस्थानचे हित जपण्याचा प्रयत्न आपले विश्वस्त मंडळासह केला. इ. स १९९७ पासून त्यांच्या विश्वस्त मंडळात त्यांच्यासह त्यांचे थोरले सुपुत्र दिलीप उर्फ ज्ञानेश्वर नारायणराव काळू हे विश्वस्त म्हणून कार्यरत होते. दिलीप उर्फ ज्ञानेश्वर नारायणराव काळू यांनी त्यांचे कार्यकाळात त्यांचे आजोबा बाबासाहेब काळू यांचे नवीन देवळासमोर पक्का सभामंडप बांधण्याचे स्वप्न पूर्ण केले तसेच त्यांच्या कार्यकाळात सभामंडप व नगारखाना रंगविण्याचे काम झाले. त्यानंतर इ. स. २०२१ पासून त्यांचे जागी त्यांचे सुपुत्र अॅड. भवानीपंत उर्फ पुष्कर ज्ञानेश्वर काळू हे संस्थानचा कारभार समर्थपणे विश्वस्त मंडळाच्या सहकार्याने चालवित असून, त्यांच्या कार्यकाळात श्रीचे गर्भगृह, परिक्रमा मार्ग, देवळासमोरील सभामंडप, नगारखाना व बुरूजाबाजूच्या भिंती रंगविण्यचे काम करण्यात आले. मंदिराच्या विकासासाठी व भक्तांना याठिकाणी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी श्रीराम मंदिर विश्वस्त मंडळाचे प्रयत्न आहेत.