वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

25 Mar 2026 18:32:34
तळोधी (बा), 
woman-dies-in-tiger-attack : नागभीड तालुक्यातील तळोधी (बा) वनपरिक्षेत्र अंतर्गत तळोधी (बा) बीटातील कक्ष क्रमांक 89 मध्ये 5 ते 6 महिला सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. तेथे बसलेल्या वाघाने त्यातील एका महिलेवर हल्ला केला. या हल्ल्यात ती जागीच ठार झाली. ही घटना बुधवार, 25 मार्च रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृत महिलेचे नाव प्रेमीला अरुण वाडगुरे (46, रा. तळोधी (बा.) असे आहे.
 
 
JK
 
प्रमिला वाडगुरे या इतर पाच ते सहा महिलांसह नेहमीप्रमाणे जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. सरपण जमा केल्यानंतर घरी परतण्याची तयारी सुरू असतानाच तेथे बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात प्रमिला वाडगुरे या गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्या. त्यांच्यासोबत असलेल्या इतर महिलांनी आरडाओरड करीत घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
 
 
वनपरिक्षेत्र अधिकारी अरूप कन्नमवार, क्षेत्र सहाय्यक अरविंद माने, वनरक्षक राजेंद्र भारणे, वनरक्षक बांगर, मागोवा पथकाचे एक पथक, यश कायरकर आणि स्वाब संघटनेचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. वाघाने मृत महिलेला घटनास्थळापासून 150 मीटर अंतरावर असलेल्या एका लहान तलावाच्या दिशेने गवताळ दाट झुडपात फरफटत नेले होते. तळोधी पोलिस ठाण्याचे ठाणेदार राहुल गुहे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. मृतदेह विच्छेदनासाठी नागभीड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. वनविभागाने तात्काळ आर्थिक मदत दिली असून, उर्वरित मदत लवकरच कुटुंबीयांना वितरित केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले.
 
10 ट्रॅप कॅमेरे आणि दोन लाईव्ह कॅमेरे
 
 
हल्ला करणार्‍या वाघाविषयी माहिती मिळवण्यासाठी वनविभागाने घटनास्थळी 10 ट्रॅप कॅमेरे आणि दोन लाईव्ह कॅमेरे लावले आहेत. वनविभागांतर्गत पुढील कारवाई सुरू असून, संबंधित भागात गस्त वाढविण्यात आली आहे. नागरिकांनी जंगलात जाणे टाळावे किंवा गटाने व खबरदारीने जावे, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0