पाच यु-ट्युबर पत्रकारांवर खंडणीचा गुन्हा

25 Mar 2026 18:35:13
चंद्रपूर,
youtube-journalists : ‘बिल्डींग मटेरियल सप्लायर’चा व्यवसाय करणार्‍या व्यक्तीला 1 लाख 50 हजार रुपयांची खंडणी मागणार्‍या पाच यु-ट्युबर पत्रकारांवर चिमूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शादुल पचारे, विलास मोहिनकर, शुभम रणदिवे, संजय नागदेवते, जितेंद्र घाडगे असे गुन्ह दाखल झालेल्या आरोपी पत्रकारांची नावे आहेत.
 
 
K
 
 
 
चिमूर पोलिस ठाण्यात 24 मार्च रोजी फिर्यादी प्रथम संजय बाळबुधे यांनी तक्रार दिली की, माझा बिल्डींग मटेरियल सप्लायरचा व्यवसाय असून, 23 मार्च रोजी रात्री 10.30 वाजताच्या दरम्यान मजूर सोडण्याकरीता मौजा उसेगाव येथे ट्रॅक्टर पाठविला असता, आरोपी शादुल पचारे, विलास मोहिनकर, शुभम रणदिवे, संजय नागदेवते, जितेंद्र घाडगे यांनी ट्रॅक्टर पांदन रस्त्यात अडवला व धमकी दिली. तसेच 1 लाख 50 हजार रुपयांची खंडणी मागितली. परंतु, ट्रॅक्टर रिकामा असल्याने व मजुरांना गावी सोडून देत असल्याचे सांगून, प्रथम बाळबुधे यांनी त्यांना कुठल्याही प्रकारचे पैसे दिले नाही व मदतीकरिता गावातील नागरीकांना फोन करून बोलविले. यावेळी 8 ते 10 नागरीक प्रथम बाळबुधे यांच्या मदतीला धावून आल्याने सर्व आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.
 
 
त्यांनतर दुसर्‍या दिवशी 24 मार्चला सकाळी पुन्हा आरोपींनी वारंवार फोन करून धमकावून खंडणी मागण्यास सुरवात केली.
हे आरोपी यु-ट्युब व काही साप्ताहिक वृत्तपत्र चालविणारे असल्याने त्यांना घाबरून बाळबुधे यांनी, ऑनलाईन 5 हजार रुपये खंडणी दिली. परंतु, आरोपींचा पुन्हा ससेमिरा सुरूच असल्याने अखेर बाळबुधे यांनी पोलिस ठाण्यात खंडणी प्रकरणी तक्रार दिली. या तक्रारीवरून पाचही आरोपींविरूद्ध खंडणी प्रकरणात कलम 308 (2),126 (2), 3 (5) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
 
 
या गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे, पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्याा मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक अमोल बारापात्रे हे करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0