नवी दिल्ली,
airline-ticket-cancellation-rules : विमान प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने २६ मार्च २०२६ पासून लागू होणारे विमान तिकीट रद्द आणि परतावा (रिफंड) नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. या नव्या नियमांमुळे प्रवाशांना अधिक सवलत, पारदर्शकता आणि जलद परतावा मिळणार आहे.
नवीन नियमानुसार, प्रवाशांना तिकीट बुक केल्यानंतर ४८ तासांच्या आत कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता तिकीट रद्द किंवा बदल करण्याची सुविधा मिळणार आहे. मात्र, ही सवलत काही अटींसह लागू असेल, जसे की देशांतर्गत उड्डाण किमान ७ दिवसांनी आणि आंतरराष्ट्रीय उड्डाण किमान १५ दिवसांनी असणे आवश्यक आहे.
याशिवाय, विमान कंपन्यांना आता परतावा वेळेत देणे बंधनकारक करण्यात आले आहे. क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या पेमेंटचा रिफंड ७ दिवसांत, तर इतर प्रकरणांमध्ये निश्चित कालावधीत परतावा देणे आवश्यक असेल.
महत्त्वाचे म्हणजे, प्रवाशांच्या परवानगीशिवाय रिफंड ‘क्रेडिट शेल’मध्ये ठेवता येणार नाही. तसेच, नॉन-रिफंडेबल तिकीट असले तरी कर आणि इतर शुल्क परत देणे अनिवार्य करण्यात आले आहे.
याशिवाय, तिकीट रद्द शुल्कावर मर्यादा घालण्यात आली असून, विमान कंपन्यांना मनमानी शुल्क आकारता येणार नाही. या नव्या नियमांमुळे विमान प्रवास अधिक ग्राहक-अनुकूल होणार असून, प्रवाशांचे हक्क अधिक मजबूत होणार असल्याचे मानले जात आहे.