डेक्कन क्वीनचा जल्लोष! सीएसएमटीवर ‘रेल्वे महोत्सव’ रंगणार

26 Mar 2026 19:41:16
मुंबई,
deccan-queen-csmt-railway-festival : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून २७ मार्च २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ऐतिहासिक ‘डेक्कन क्वीन एक्सप्रेस’चा रेल्वे महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या खास सोहळ्याची सुरुवात गाडी सुटण्याच्या एक तास आधी, म्हणजे सायंकाळी ५:१० वाजता होणार असून गाडीला फुलांनी आकर्षक सजावट केली जाणार आहे. यावेळी डेक्कन क्वीनचा समृद्ध इतिहास दृकश्राव्य माध्यमातून सादर केला जाईल.
 
 
 
deccan-queen-csmt-railway-festival
 
 
प्रवाशांच्या सोयीसाठी आणि गाडीचे ऐतिहासिक महत्त्व जपण्यासाठी डेक्कन क्वीनमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. डायनिंग कारचे पारंपरिक सौंदर्य राखत तिचे नूतनीकरण करण्यात आले असून आसनव्यवस्था, छत आणि फरशी आधुनिक करण्यात आली आहे. स्वच्छतेसाठी स्वच्छतागृहांमध्ये नवीन सुविधा देण्यात आल्या आहेत, तर एसी डब्यांमध्ये सुधारित सीट कव्हर्स, आकर्षक डिझाइन आणि सुगंधी व्यवस्था बसवण्यात आली आहे.
 
१ जून १९३० रोजी सुरू झालेली डेक्कन क्वीन ही मुंबई-पुणे दरम्यान धावणारी देशातील पहिली सुपरफास्ट आणि विजेवर चालणारी प्रतिष्ठित गाडी आहे. ‘महिलांसाठी खास डबा’ आणि ‘डायनिंग कार’ असलेली ही पहिल्यांदाच सुरू झालेली रेल्वे ठरली होती. काळानुसार या गाडीने आधुनिक एलएचबी डब्यांपर्यंत प्रवास करत सुरक्षितता आणि आरामातही मोठी प्रगती केली आहे.
 
डेक्कन क्वीन ही केवळ रेल्वेगाडी नसून अनेक पिढ्यांच्या आठवणींशी जोडलेली एक भावना आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून मध्य रेल्वेने प्रवासी आणि रेल्वेप्रेमींना या ऐतिहासिक वारशाचा उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
Powered By Sangraha 9.0