रणवीर सिंहचा ‘धुरंधर २’ वादाच्या भोवऱ्यात! ‘या’ राज्यात बंदीची मागणी

26 Mar 2026 13:09:01
मुंबई
Dhurandhar 2 Controversy रणवीर सिंहचा बहुचर्चित चित्रपट ‘धुरंधर: द रिव्हेंज’ सध्या बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत आहे. देशासह परदेशातही या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र चित्रपटाच्या यशाबरोबरच वादही वाढताना दिसत आहेत. विशेषतः एका राज्यात या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी झाल्याने नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. काहीजण या चित्रपटात राजकीय संदेश असल्याचा आरोप करत आहेत. विशेषतः तमिळनाडू राज्यात या चित्रपटाच्या प्रदर्शनावर आक्षेप घेण्यात आला आहे. या प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा न्यायालयात पोहोचला आहे.
 

Dhurandhar 2 Controversy 
शीला नावाच्या एका वकिलाने न्यायालयात अपील दाखल करत या चित्रपटात राजकीय संदर्भ असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते, चित्रपटातील कथानक मतदारांच्या भावना प्रभावित करू शकते आणि निवडणुकीच्या वातावरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. याचिकेत असेही नमूद करण्यात आले आहे की चित्रपटातील काही प्रसंग आणि संवेदनशील कथा राजकीय दृष्टिकोनातून मतदारांवर प्रभाव टाकू शकतात. त्यामुळे निवडणुकीपूर्वी तमिळनाडूमध्ये या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान न्यायालयाने यासंदर्भात औपचारिक याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले असून त्यानंतरच या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. दरम्यान या वादाबाबत चित्रपटाचे दिग्दर्शक किंवा निर्माते यांची अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
Powered By Sangraha 9.0