कोल्हापूर,
Dr. Jayasingrao Pawar passes away मराठेशाहीच्या इतिहासाचा सखोल अभ्यास करणारे ज्येष्ठ संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने इतिहास क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून मराठेशाहीचा अभ्यासक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ढासळलेली होती. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे जवळपास दीड महिना त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
लोकप्रिय प्राध्यापक म्हणून विशेष ओळख
राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचे ते कट्टर पुरस्कर्ते म्हणून ओळखले जात. समाजापर्यंत शाहू महाराजांचे कार्य आणि धोरणे पोहोचवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर परिश्रम घेतले. ३० डिसेंबर १९४१ रोजी सांगली जिल्ह्यातील तडसर येथे त्यांचा जन्म झाला. शिवाजी विद्यापीठ येथून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण आणि डॉक्टरेट पूर्ण केली. तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी महाविद्यालयात अध्यापन करत अनेक विद्यार्थ्यांना इतिहासाची गोडी लावली. विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची विशेष ओळख होती.
मराठेशाहीच्या विविध पैलूंवर अभ्यासपूर्ण लेखन
डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधनाची वाट धरली आणि पुढे मराठेशाहीच्या विविध पैलूंवर अभ्यासपूर्ण लेखन केले. महाराणी ताराबाई, सेनापती संताजी घोरपडे, मराठेशाहीचा मागोवा यांसारख्या विषयांवर त्यांनी दोन डझनांहून अधिक ग्रंथ प्रकाशित केले. त्यांच्या ‘पंचगंगा तिरी’ या आत्मचरित्रालाही मोठी लोकप्रियता मिळाली.इतिहासातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे मोठे काम त्यांनी केले. विशेषतः ताराराणींच्या चरित्रातून त्यांच्या कर्तृत्वाचा परिचय करून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनाने इतिहास अभ्यासक, विद्यार्थी आणि समाजमनात शोककळा पसरली असून त्यांच्या कार्याची आठवण कायम प्रेरणा देणारी ठरेल, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.