तेहरान,
Increase in crude oil prices मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचे पडसाद आता जागतिक इंधन बाजारात उमटू लागले असून कच्च्या तेलाच्या दरांनी पुन्हा उसळी घेतली आहे. गुरुवारी आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट कच्चे तेल प्रति पिंप १०३ डॉलरच्या पुढे गेले, तर डब्ल्यूटीआय कच्चे तेल देखील मोठ्या वाढीसह उच्च पातळीवर व्यवहार करत होते. या घडामोडींमुळे गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.या दरवाढीमागे प्रमुख कारण म्हणून इराणने अमेरिकासोबत थेट चर्चा करण्यास दिलेला नकार मानला जात आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, काही देशांमार्फत संवाद सुरू असला तरी त्याला थेट चर्चा म्हणता येणार नाही. पूर्वीच्या अनुभवांचा दाखला देत त्यांनी सध्यातरी थेट वाटाघाटींची शक्यता नाकारली आहे.
दुसरीकडे अमेरिकेकडून मात्र वेगळीच भूमिका मांडली जात असून, दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे. या परस्परविरोधी विधानांमुळे बाजारात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून त्याचा परिणाम तेलाच्या दरांवर दिसून येत आहे. होर्मुझची सामुद्रधुनी येथील परिस्थितीही अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. जगातील मोठा तेलपुरवठा या मार्गातून होत असल्याने येथे कोणताही अडथळा निर्माण झाल्यास त्याचा थेट परिणाम जागतिक पुरवठ्यावर होऊ शकतो आणि दर आणखी वाढण्याची शक्यता निर्माण होते.