मोठा निर्णय; राज्यात शिधापत्रिकाधारकांना मिळणार ३ लिटर केरोसीन

26 Mar 2026 15:38:29
मुंबई,
Kerosene will be available in state आखाती देशांमधील तणावपूर्ण परिस्थितीचे पडसाद आता भारतातही उमटू लागले आहेत. गॅसचा तुटवडा जाणवू लागल्याने अनेक ठिकाणी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत केंद्राकडून मोठ्या प्रमाणात केरोसीनचा साठा मंजूर करून घेतला आहे. राज्यासाठी ३७ लाख ४४ हजार लिटर केरोसीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
 
 

Kerosene 
गॅस पुरवठ्यातील अडचणी लक्षात घेता घरगुती वापरासाठी पुन्हा स्टोव्हचा आधार घ्यावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाच्या योजनेनुसार शिधापत्रिका असलेल्या प्रत्येक कुटुंबाला तीन लिटर केरोसीन देण्यात येणार असून ही व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आली आहे. यासाठी राज्यभर जिल्हानिहाय नियोजन करण्यात आले असून मार्च आणि एप्रिल २०२६ या कालावधीत सरकारी तेल कंपन्यांच्या माध्यमातून केरोसीनचे वितरण केले जाणार आहे. एकूण साठ्यापैकी बहुतांश म्हणजे सुमारे ८५ टक्के केरोसीन पहिल्या पंधरवड्यातच नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 
श्वेतपत्रिका धारकांनाही सवलतीचा फायदा
शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना ठराविक प्रमाणात केरोसीन मिळणार आहे, तर शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांनाही उपलब्धतेनुसार या योजनेचा लाभ देण्याचा विचार सरकार करत आहे. श्वेतपत्रिका धारकांनाही या सवलतीचा फायदा मिळू शकतो, अशी माहिती समोर येत आहे. आखाती भागातील संघर्षामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्यावर ताण निर्माण झाला आहे आणि त्याचा परिणाम भारतातही जाणवत आहे. घरगुती वापरासाठी इंधनाची कमतरता भासू नये यासाठी शासन प्रयत्नशील असून, केरोसीन वाटपाचा निर्णय हा संभाव्य संकटाला सामोरे जाण्यासाठी उचललेला एक महत्त्वाचा उपाय मानला जात आहे.
Powered By Sangraha 9.0