- शासकीय नर्सिंग कॉलेजमधील घटना : सर्व विद्यार्थीनींवर उपचार सुरू
गोंदिया,
Poisoning of students येथील केटीएस जिल्हा रुग्णालयांतर्गत येणार्या बाई गंगाबाई रुग्णालयातील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या ४५ विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना आज, गुरुवारी २६ मार्च सकाळच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, सर्व विद्यार्थीनींना उपचारासाठी स्थानिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भर्ती करण्यात आले असून सर्व विद्यार्थिनींची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
Poisoning of students बाधित विद्यार्थीनींमध्ये आरती चौधरी, प्रांजली डोंगरवार, कुशिका बोपचे, स्नेहा उईके, त्रिवेणी पवार, रिमा दहागावकर, मोहिनी सोनवाने, डॉली सूर्यवंशी, सलोनी दमाहे, रिया डोंगरे, त्रिशा सेलोकर, सलोनी जनबंधू, मयुरी भेंडारकर, चंदा टेकाम, पायल फुंडे, सोनाली देवधनी, कृशाली भगत, रजनी रहांगडाले, श्वेता डोंगरे, कोमल भावे, दीपा दहीकर आदी विद्यार्थीनींचा समावेश असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या आवारात शासकीय नर्सिंग कॉलेज असून १८५ निवासी विद्यार्थीनी येथे नर्सिंगचे प्रशिक्षण घेत आहेत. सर्व विद्यार्थिनींना कॉलेजच्या कॅन्टीन मधून जेवण आणि नाश्ता दिला जातो. दरम्यान, बुधवारी २५ मार्च रोजी रात्री विद्यार्थिनींनी जेवण करुन झोपी गेल्या. यानंतर मात्र, गुरुवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास विद्यार्थिंनींना पोटात दुखणे व उलट्या होऊ लागल्या त्यामुळे एक-एक करत दुपारी २ वाजतापर्यंत ४५ विद्यार्थीनींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. विशेष म्हणजे, नर्सिंग कॉलेजमधील सर्व १८५ विद्यार्थिंनींनी कॅन्टीनचे जेवण केले. त्यापैकी ४५ विद्यार्थिंनींना त्रास झाला. त्यामुळे नेमके या विद्यार्थिंनींना विषबाधा कशातून झाली हे स्पष्ट झाले नाही. मात्र, बुधवारी रात्री जेवण केल्यानंतर हा प्रकार घडल्याने जेवणातून तर विषबाधा झाली नसावी अशी शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सर्व ४५ विद्यार्थिंनींवर मेडिकलमध्ये उपचार सुरु असून विद्यार्थिंनींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.