मन मंदिरातील राम

26 Mar 2026 11:07:23
प्रासंगिक...
 
- प्रसाद दत्तात्रेय पोफळी
shri ram charitra सध्या सोशल मीडियाचे युग आहे. चोवीस तास माहितीचा भडिमार आणि क्षणाक्षणाला बदलणारे ट्रेंड्स यांच्या गराड्यात आपण जगत आहोत. अशा काळात रामायण काळातील, सत्ययुगातील रामचरित्राचे वर्तमान संदर्भात काय औचित्य? असा प्रश्न कधीकधी काही लोकांच्या मनात येतो. ‘‘आजकाल ना कशातच राम राहिला नाही!’’ कधी कधी उद्वेगाने आलेले निराशेचे असे उद्गार आपल्या कानावर अनेकदा पडतात. ‘‘रामचंद्र कह गए सिया से ऐसा कलयुग आएगा, हंस चुगेगा दाना और कौआ मोती खायेगा’’ एका गाण्यात प्रत्यक्ष श्रीरामांच्या तोंडी असलेल्या या ओळी आपल्याला प्रत्ययास येत आहेत असेही कधी कधी आपल्याला जाणवायला लागते. आणि आपण विचार करायला लागतो की खरंच आजकाल कशात रामच राहिला नाही!
 

shriram 
 
असा विचार करीत असतानाच आज रामनवमीच्या दिवशी श्रीरामाच्या चरित्राचे, गीतरामायणाचे बोल आपल्या कानावर पडत असतात. आदर्श आणि व्यवहार यांचे द्वंद्व मनात सुरू असते. पण जर आपण श्रीरामांकडे केवळ एक दैवत म्हणून न पाहता एक आदर्श मनुष्य (मर्यादा पुरुषोत्तम) म्हणून पाहिले, तर या वर्तमान काळात जगताना तेच सर्वांत मोठे मार्गदर्शक ठरतात. समाजातील व्यवहार आणि मानवी मूल्ये यांचा आपल्या व्यावहारिक जीवनात ताळमेळ साधण्यासाठी श्रीरामाकडे देव म्हणून नव्हे तर माणूस म्हणून बघायला, त्यादृष्टीने त्यांचे चरित्र वाचायला शिकले पाहिजे.
कर्तव्यदक्षता आणि नातेसंबंध : श्रीरामाचे आपल्या पत्नीबद्दलचे, सीतेबद्दलचे प्रेम हे केवळ भावनिक नव्हते, तर ते स्त्री सन्मान आणि आदर यावर आधारलेले होते. आजच्या केवळ शारीरिक आकर्षणाच्या आणि भौतिक सुखाच्या पाठीमागे धावण्याच्या काळात जिथे नाती ठिसूळ होत आहेत, तिथे रामाचे एकपत्नीव्रत आणि सीतेची कठीण प्रसंगातही पत्नी म्हणून पतीला साथ देण्याची वृत्ती प्रेरणादायी आहे. पण असा राम आणि अशी सीता आपल्या युवा पिढीच्या मनात लहानपणापासून रुजविण्याचे काम आपण केले आहे का? आणि आजही करतो आहोत का ?
 
शक्ती, बुद्धी, युद्ध कौशल्य, पराक्रम या सर्व बाबींमध्ये सर्वश्रेष्ठ असलेला राम कैकैयीच्या सावत्रभावाने झालेल्या अन्यायाने पेटून उठत नाही. उलट यामुळे आपल्या पित्यावर ओढवलेल्या धर्मसंकटात त्यांना धीर देत, निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारून वनवासाला जाण्याची तयारी करते.
 
त्याचप्रमाणे श्रीरामाच्या पादुका ठेवून राज्य करणारा भरत हे बंधुप्रेमाचे अत्युच्च शिखर आहे. 14 वर्षांचा वनवास संपवून राम जेव्हा अयोध्येला परत येतात तेव्हा आपल्या खांद्यावरचे मानवस्त्र जमिनीवर पसरवून रामचरणांसाठी पायघड्या घालणारा भरत रामाइतकाच महत्त्वाचा. पण भावाकडून अशी अपेक्षा करतानाच त्यासाठी आधी रामासारखी संतुलित, संयमित वृत्ती आपल्या मनात असायला हवी.
लोकसंग्रह आणि नेतृत्व : श्रीरामांनी अयोध्येच्या गादीवर बसून सत्ता गाजवली नाही तरीही बालपणी आणि किशोरावस्थेत अयोध्या नगरवासीयांच्या सोबतच्या त्यांच्या व्यवहाराने नगरवासीयांच्या मनात रामाप्रति आत्मीयतेची भावना निर्माण झाली होती. राम वनवासाला निघाले असताना त्यांच्या मागोमाग नगराच्या वेशीपर्यंत धावत जाणारे प्रजाजन हे त्या आत्मीयभावाचे दर्शन आहे. आज लोकनेत्याच्या मनात जनसामान्यांविषयी संवेदनशीलता आणि जनमानसात नेत्यांप्रति अशी आत्मीयता असावी असे वाटत असेल तर दोघांच्याही मनात राम असायलाच हवा ना !
मर्यादित साधनांतून उद्दिष्ट साध्य करण्याचे कौशल्य : आजच्या कॉर्पोरेट जगात आपण लीडरशिप आणि टीम मॅनेजमेंट शिकतो, पण रामाचे चरित्र हे याचा चालता-बोलता वस्तुपाठ आहे. राजमहालातून निघून वनवास स्वीकारणे म्हणजे खरे तर अडचणींचा डोंगरच समोर उभा होता. पण त्या वनवासातील काळात जागोजागी वनात वसलेल्या वनवासींना आपल्या आत्मीय व्यवहाराने आपल्यासोबत जोडून घेण्यासाठी त्याचा उपयोग करण्याचे आणि वनवासाला आपत्ती न समजता त्याचीच इष्टापत्ती करण्याचे व्यवहारचातुर्य रामांनी दाखविले. रामाचे संघटनकौशल्य, युद्धचातुर्य आणि नेतृत्वगुण तेव्हा दिसतात जेव्हा ते कोणत्याही मोठ्या सैन्याशिवाय, केवळ वनवासी आणि वानर टोळीच्या मदतीने बलाढ्य रावणाचा पराभव करतात. आजच्या भाषेत सांगायचे तर, मर्यादित संसाधनांचा प्रभावी वापर करून अशक्य ध्येय गाठणे हे रामाकडून शिकण्यासारखे आहे.
सोशल मीडिया आणि आपली वैचारिक पातळी : सोशल मीडियावर आज अनेक विषयांच्या संदर्भात पोस्ट आणि प्रतिक्रियांचा पाऊस पडत असतो. जेवढी मने तेवढी मतमतांतरे तर असतातच. काही कायम असंतुष्ट लोकांच्या पोस्ट्स तर संताप आणणाèया असतात. पण त्यावर व्यक्त होतानाही आजकाल बरेचदा आक्रस्ताळेपणा, अकांडतांडव बघायला मिळतो. त्या प्रतिक्रियांचा, भाषेचा स्तरही तितकाच खालावलेला असतो.
 
अशा वेळी स्वामी विवेकानंदांचे एक मार्मिक उदाहरण आठवते. शिकागोच्या परिषदेनंतर त्यांनी आपले शिष्य अलसिंगा पेरूमल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते :
‘‘कोणत्याही आम्रवृक्षाखाली जा. तिथे पडलेली सडकी, नासलेली, कच्ची फळे टोपल्यांनी जमा करा. त्यातील प्रत्येकावर लांबलचक निबंध लिहा. तरीही त्या आम्रवृक्षाचे खरे आणि सार्थक वर्णन केले असे होणार नाही. नंतर फक्त त्या वृक्षाचे एकच पूर्ण पक्व, मधुर फळ काढून आणा. ते चाखून पाहा आणि तुम्हाला लगेच त्या आम्रवृक्षाची महती ध्यानात येईल.’’
आज आपण सोशल मीडियावर केवळ सडकी फळे शोधण्यात आणि त्यावर चर्चा करण्यात मग्न आहोत. त्यामुळेच आज अनुकूलतेच्या काळातही हिंदू जनमानसावर होणाऱ्या आघातांनी मन क्षुब्ध होते. सव्वाशे-दीडशे वर्षांपूर्वीही असे आघात होत होते. मात्र त्यावेळी प्रतिक्रियेत असा आक्रस्ताळेपणा नव्हता.shri ram charitra का ? काय कारण असावे? कारण तेव्हा समाजात एक संचित संयम होता. जो या रामानेच मनामनात रुजवला होता.
 
जगातील आनंदी देशांच्या क्रमवारीत आज भारत 116 व्या क्रमांकावर आहे असे नुकतेच जाहीर झाले आहे. (ही तुलना करण्याचे आणि हे ठरविण्याचे त्यांचे मापदंड कितपत योग्य आहेत हा भाग वेगळा) पण आपण मागे का पडतो?
याचे एक मुख्य कारण म्हणजे, आपली रामकृपेवरची श्रद्धा, प्राप्त परिस्थितीत संतुष्ट राहण्याची वृत्ती, ती इष्टापत्तीच आहे असा मनात असलेला विश्वास डळमळीत झाला आहे. मग मंदिरात राम आला असला तरी आपल्या मनात राम राहिला नाही काय? असा प्रश्न सहजच मनात येतो.
मंदिरे : केवळ वास्तू नव्हे, तर ऊर्जा केंद्रे : आज आपण भव्य मंदिरे उभारत आहोत, पण ही मंदिरे केवळ गाभाèयातील मूर्तींच्या दर्शनापुरती मर्यादित न राहता ती ऊर्जा केंद्रे व्हायला हवीत. तिथून सामाजिक समरसता, शिस्त आणि चारित्र्यनिर्मितीचा राम विचार मनामनात प्रसवला पाहिजे. जेव्हा समाज रामाच्या गुणांचे अनुकरण करतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने मंदिराचे उद्दिष्ट साध्य होते.
 
‘‘रामजन्मभूमीतील भव्य मंदिरात श्रीरामांची प्राण प्रतिष्ठापना झाली आता समाजात प्रत्येक मनमंदिरात रामाची प्रतिष्ठापना व्हायला हवी.’’
22 जानेवारी 2024 ला राम जन्मभूमी अयोध्या येथे श्रीरामांच्या बालमूर्तीची प्राण प्रतिष्ठापना झाली त्यावेळी बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केलेले हे वक्तव्य आहे. या वक्तव्याच्या वेळी त्या परिसरात गुंजलेला टाळ्यांचा नाद आपल्या मनात निनादत राहिला तरच हे शक्य आहे.
 
जेव्हा आपल्या मनात राम प्रतिष्ठापित होईल, तो नेहमी जागा राहील, आपल्या विचारांत आणि कृतीत उतरेल तेव्हाच समाजात संयम, नीतिमत्ता आणि आनंद नांदेल. या मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाची तुमच्या, माझ्या, सर्वांच्या मनामनात प्रतिष्ठाापना व्हावी हीच या रामनवमी उत्सव निमित्ताने श्रीराम चरणी प्रार्थना !
 
9822569648
Powered By Sangraha 9.0