वेध....
नंदकिशोर काथवटे
hypocrisy महाराष्ट्रात गेल्या 13 वर्षांत भोंदूगिरीचे तब्बल 2 हजार गुन्हे नोंदले गेले- ही केवळ आकडेवारी नाही, तर समाजाच्या विवेकबुद्धीवर उठलेला गंभीर प्रश्न आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर ते छत्रपती संभाजीनगर अशा अनेक जिल्ह्यांत हे गुन्हे सातत्याने समोर येत आहेत. म्हणजेच हा प्रश्न एखाद्या गावापुरता किंवा दुर्गम भागापुरता मर्यादित नाही, तर शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत अंधश्रद्धेची पकड तितकीच मजबूत आहे.
या प्रकरणांमधील सर्वांत वेदनादायक बाब म्हणजे महिलांचे होणारे शोषण. अनेक प्रकरणांत देवदर्शन, उपचार, वाईट शक्ती काढणे अशा नावाखाली महिलांवर अत्याचार झाले, त्यांचे मानसिक आणि शारीरिक शोषण झाले. भीती, लाज आणि सामाजिक दबावामुळे अनेक महिला तक्रार करण्यासही पुढे येत नाहीत. त्यामुळे प्रत्यक्षात घडणाऱ्या घटनांची संख्या ही नोंद झालेल्या गुन्ह्यांपेक्षा कितीतरी पटीने अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सरकारने अंधश्रद्धा विरोधी कायदा केला, त्यात सुधारणा केल्या, समित्या नेमल्या. पण या कायद्याची अंमलबजावणी अजूनही अपेक्षित पातळीवर दिसत नाही. अनेक वेळा पोलिस यंत्रणा तक्रार आल्याशिवाय हालचाल करत नाही. आणि जेव्हा तक्रार येते, तेव्हा तोपर्यंत मोठी फसवणूक किंवा अत्याचार घडून गेलेला असतो. कायद्याचा धाक निर्माण होण्याऐवजी, भोंदू बाबांची निर्भयता वाढत चालली आहे. पण या सगळ्यात केवळ भोंदू बाबांना दोष देऊन आपण मोकळे होऊ शकत नाही. कारण त्यांची दुकाने चालतात ती आपल्या विश्वासावर. आपणच त्यांच्या पायाशी नतमस्तक होतो, त्यांच्या प्रत्येक शब्दाला सत्य मानतो आणि आपल्या समस्या सोडवण्यासाठी विवेक बाजूला ठेवतो.
आजही अनेक लोक आजारांवर वैद्यकीय उपचाराऐवजी भोंदू बाबांकडे जातात. आर्थिक संकट, कौटुंबिक कलह किंवा वैयक्तिक अडचणी यावर झटपट उपाय मिळेल या आशेने लोक लाखो रुपये खर्च करतात. हा पैसा, हा विश्वास-सगळे काही एका भ्रमावर उभे असते. आणि जेव्हा हा भ्रम तुटतो, तेव्हा हातात उरते ती केवळ फसवणूक. श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा नसावी, ही साधी गोष्ट आपण विसरत चाललो आहोत. श्रद्धा माणसाला उभारी देते, पण अंधश्रद्धा त्याला गुलाम बनवते. आज समाजात श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धा वाढवली जात आहे. काही भोंदू बाबा तर थेट ईश्वरालाच आव्हान देत आहेत, मीच सर्वकाही करू शकतो असा दावा करत आहेत. आणि दुर्दैव म्हणजे, लोक त्यावर विश्वास ठेवत आहेत. महिलांच्या शोषणाच्या घटना, वेगवेगळ्या जिल्ह्यांतील गुन्ह्यांची वाढती संख्या आणि प्रशासनाची संथ भूमिका, या सगळ्यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते की, हा प्रश्न केवळ कायद्याने सुटणार नाही. यासाठी समाजमन बदलणे अत्यावश्यक आहे. शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि प्रश्न विचारण्याची सवय हेच अंधश्रद्धेवरचे खरे औषध आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वतःला विचारायला हवे की, आपण खरोखरच विवेकाने जगतोय का? की अजूनही भीती आणि अज्ञानाच्या आधारे निर्णय घेतोय? 2 हजार गुन्ह्यांची ही आकडेवारी केवळ भूतकाळ नाही, ती एक इशारा आहे. जर आपण अजूनही जागे झालो नाही, तर उद्या ही संख्या आणखी वाढेल. आणि त्यासाठी दोष फक्त भोंदू बाबांचा नसेल, तर आपल्या अंधविश्वासाचाही असेल.
वेळ आली आहे डोळे उघडण्याची, आवाज उठवण्याची आणि अंधश्रद्धेच्या या साखळ्या तोडण्याची. नाहीतर चमत्कार या नावाखाली आपलीच फसवणूक होत राहील आणि आपण त्याला नियती समजत राहू. या परिस्थितीकडे केवळ सामाजिक प्रश्न म्हणून न पाहता, ती एक गंभीर मानसिकता बनत चालली आहे हेही लक्षात घ्यावे लागेल. अंधश्रद्धेच्या या विळख्यात अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. काही ठिकाणी घरातील सर्व निर्णय हे भोंदू बाबांच्या सांगण्यावर घेतले जातात. इग्न, शिक्षण, व्यवसाय, आजारपण यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींचाही निर्णय विवेकाऐवजी अंधविश्वासावर आधारित घेतला जातो. परिणामी, चुकीचे निर्णय, आर्थिक नुकसान आणि मानसिक ताण यांचे दुष्परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. ही केवळ व्यक्तीची चूक नसून, समाजातील चुकीच्या विचारसरणीची साखळी आहे जी एकामागून एक लोकांना अंधाराकडे ढकलत आहे.
म्हणूनच आज गरज आहे ती सामूहिक जबाबदारीची. पालकांनी मुलांना लहानपणापासून वैज्ञानिक दृष्टिकोन देणे, शाळांनी विवेकवादी विचार शिकवणे आणि समाजातील जागरूक घटकांनी अशा प्रकारांविरोधात उघडपणे आवाज उठवणे आवश्यक आहे. माध्यमांनीही फक्त घटना मांडण्यापलीकडे जाऊन जनजागृतीची भूमिका पार पाडली पाहिजे. प्रत्येकाने ठरवले की मी अंधश्रद्धेला बळी पडणार नाही, तरच हा बदल शक्य आहे.hypocrisy कारण भोंदूगिरी थांबवण्याची खरी ताकद कायद्यापेक्षा समाजाच्या जागृतीत आहे आणि ती जागृती आता प्रत्येकाच्या मनात पेटण्याची वेळ आली आहे.
9922999588