अंजनगाव सुर्जी,
heavy-vehicle-diesel : डिझेल तुटवड्याच्या पृष्ठभूमीवर अंजानगाव सुर्जी येथील पेट्रोल पंप चालकांनी अवजड मालवाहतूक वाहनांसाठी केवळ ३० लीटर डिझेलची मर्यादा निश्चित केली होती. मात्र, यामुळे शेतकर्यांच्या नाशवंत मालाची वाहतूक आणि वाहनधारकांचे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली होती. या अन्यायाविरोधात आज अंजानगाव सुर्जी येथील ट्रकचालक-मालक आणि जिल्हा काँग्रेस सरचिटणीस मो. सिद्दीक यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. आता त्यांना ३०० लिटर डिझेल मिळणार आहे.

इराण-अमेरीका संघर्षामुळे इंधन पुरवठ्याबाबत अनिश्चितता असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असताना, पेट्रोल-डिझेलचा तुटवडा ही नवी समस्या उभी राहिली होती. अवजड मालवाहतूकदारांनी एकत्र येत किमान २०० लीटर डिझेल मिळावे अशी मागणी तहसील कार्यालयात केली. तहसीलदार पुष्पा सोळंके यांनी वाहनचालकांच्या या न्याय मागणीची तात्काळ दखल घेतली. त्यांनी सर्व पेट्रोल पंप चालकांना लांबच्या प्रवासाला जाणार्या अवजड वाहनांची बिल्टी पाहून त्यांना ३०० लीटर डिझेल देण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे अवजड वाहतूकदारांचा प्रश्न तात्काळ निकाली निघाला असून, शेतकर्यांचा माल वेळेवर बाजारपेठेत पोहोचण्यास मदत होणार आहे. यावेळी मो. इद्रीस मो. जहिरोद्दीन, विजय नेमाडे, शकील अहमद अ. आबीद, म. जाकीर म. शाकीर, सै. नुरोद्दीन जयरोद्दीन, नईमखान सलीम खान, अ. सईद अ. गनी, आदिल खाँन वहिद खान, शहजाद अ. हक, म. नदीम, मो. नसीर खानआहमद खान, सै. हारुन मो. जाकीर, शे. रिजवान, सै. जुबेर, शाहरुख खान यांच्यासह अनेक अवजड वाहतूकदार उपस्थित होते.