काठमांडू,
Balen Shah was the Prime Minister नेपाळच्या राजकारणात एक ऐतिहासिक घडामोड घडली असून बालेन शाह यांनी देशाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. अवघ्या ३५ व्या वर्षी ते नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरले आहेत. रॅप गायक आणि अभियंता अशी ओळख असलेले बालेन शाह यांचा शपथविधी रामचंद्र पौडेलयांच्या उपस्थितीत काठमांडूतील शीतल निवास येथे पार पडला. या सोहळ्यात हिंदू आणि बौद्ध परंपरांचा संगम पाहायला मिळाला, ज्यामुळे वातावरण अधिक भव्य झाले. अलीकडेच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बालेन शाह यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने मोठे यश मिळवले. २७५ सदस्यीय प्रतिनिधी सभागृहात या पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत पारंपरिक पक्षांना मागे टाकले.

बालेन शाह यांनी स्वतः के. पी. शर्मा ओली यांचा त्यांच्या बालेकिल्ल्यात पराभव करत राजकीय क्षेत्रात मोठी छाप पाडली. या निकालामुळे नेपाळच्या राजकारणात मोठा बदल झाल्याचे चित्र दिसून आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून भ्रष्टाचार आणि घराणेशाहीविरोधात तरुणांनी उभारलेल्या आंदोलनांमुळे सत्तांतराचा मार्ग मोकळा झाला होता. या पार्श्वभूमीवर बालेन शाह यांचे नेतृत्व पुढे आले आणि तरुणांच्या अपेक्षांना बळ मिळाले. काठमांडूचे महापौर म्हणून काम करताना त्यांनी शहर विकासासाठी अनेक उपक्रम राबवले होते, तर त्यांच्या गाण्यांमधूनही त्यांनी सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवला होता. पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर बालेन शाह आता छोट्या मंत्रिमंडळाची स्थापना करण्याच्या तयारीत आहेत. भ्रष्टाचारावर आळा घालणे, तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करणे आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणे ही त्यांच्यासमोरील प्रमुख आव्हाने असणार आहेत. पारंपरिक राजकारणाला धक्का देत नव्या नेतृत्वाचा उदय झाल्यामुळे नेपाळमध्ये बदलाची नवी आशा निर्माण झाली आहे.