सेलूत १३ वर्षांपासुन ‘ती ’ इमारत आजारीच

27 Mar 2026 21:01:51
विजय माहुरे
सेलू, 
building-construction : सेलू तालुक्यात अशीही एक शासकीय इमारत ज्या इमारतीचे बांधकाम १३ वर्षापूर्वी सुरू झाले. पण, अजूनही ती इमारत पूर्ण झाली नाही. नव्हे गत काही वर्षापासून बांधकामच थांबले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली अर्धवट काम झालेल्या इमारतीचे पुढे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
 
j
 
 
 
तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य जोपासता यावे म्हणून अधिकारी व कर्मचार्‍यांच्या निवासस्थानकरिता तत्कालीन सरकारने इमारतीचे बांधकाम करण्याकरिता निधी मंजूर केला होता. १३ वर्ष झाली तरी ती इमारत पूर्ण झाली नाही. मग या इमारतीवर खर्च झालेल्या लाखो रुपयाचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात २६ एप्रिल २०१३ रोजी ३४९.१५ लक्ष रुपयाच्या बांधकामाचा शुभारंभ तत्कालीन राज्यमंत्री रणजित कांबळे, माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आला. अवघ्या एक महिन्या नंतर या शुभारंभाला १३ वर्ष पूर्ण होत आहे. मात्र अर्धवट बांधकाम असलेली इमारत पाहून तालुयातील नागरिक अचंबित होत आहेत.
 
 
गत पाच वर्षात याच परिसरात नवीन इमारती तयार झाल्या, पण अर्धवट असलेल्या इमारतीकडे शासनाचे दुर्लक्ष का असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या इमारतीची पडझड ही सुरू झाली असताना तालुयाच्या विकासात १३ वर्षाच्या कालखंडानंतरही अर्धवट असलेली इमारत उघड्या डोळ्यांनी पाहण्याची वेळ तालुका वासियावर यावी ही शोकांतिका आहे. याला तालुयाचा विकास म्हणावा काय हा संशोधनाचा विषय ठरू पाहत आहे.
 
 
सांगा ना साहेब काय झाले?
 
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली सुरू झालेल्या या इमारतीचे बांधकाम अर्धवट असून गत काही वर्षापासून बांधकाम बंद आहे. या अर्धवट इमारतीवर झालेला लाखो रुपयांचा खर्च व्यर्थ जात आहे. पण असे झाले तरी काय ती इमारत १३ वर्षातही पूर्ण झाली नाही म्हणून तालुकावासी विचारताहेत सांगा ना साहेब या इमारतीचे बांधकाम पूर्ण का झाले नाही?
 
 
अनेक वेळा या ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात नव्याने इमारती बांधण्यात आल्या. तेव्हा लोकप्रतिनिधी येथे आले पण या अर्धवट इमारतीवर लक्ष गेले नाही हे विशेष. पण, या अर्धवट इमारतीवर झालेला खर्च व्यर्थ गेला. त्याचे काय हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहत आहे
Powered By Sangraha 9.0