खबरदार अफवा पसरविल्या तर...

27 Mar 2026 15:50:09
मुंबई,
Devendra Fadnavis' warning अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे देशात इंधन पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या चिंतेवर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. एका वैद्यकीय परिषदेनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी नागरिकांना अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलची कोणतीही कमतरता नसून पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात दहा रुपयांची कपात करण्यात आली आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा भार तेल कंपन्या आणि केंद्र सरकार स्वतः उचलत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक ताण येणार नाही. त्यामुळे इंधन दरांमध्ये अनावश्यक वाढ होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
devndra
 
देशातील काही भागांत पेट्रोल पंपांवर दिसणाऱ्या रांगांबाबत त्यांनी चिंता व्यक्त करत सांगितले की, घाबरून मोठ्या प्रमाणात इंधन साठवण्याची गरज नाही. भारताकडे सुमारे एका महिन्याचा पुरेसा इंधनसाठा आहे. नागरिकांनी नेहमीप्रमाणेच इंधन खरेदी करावे, अन्यथा कृत्रिम टंचाई निर्माण होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.दरम्यान, लॉकडाऊनबाबत पसरत असलेल्या अफवांवरही त्यांनी भाष्य केले. केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, देशात लॉकडाऊन लावण्याचा कोणताही विचार नाही. तरीही खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
 
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेला प्राधान्य
शेजारील काही देशांमध्ये इंधन आणि गॅसच्या टंचाईमुळे अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी भारताने योग्य नियोजन करून पुरवठा सुरळीत ठेवला आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठाही हळूहळू वाढत असून तो लवकरच अधिक सुधारेल, असे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी आरोग्य क्षेत्रातील प्रगतीवरही भाष्य केले. राज्यातील प्रत्येक नागरिकाला काही किलोमीटरच्या अंतरात दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेद्वारे अधिक सुविधा देण्यावर भर दिला जात असून विशेष रुग्णालये उभारण्याचे नियोजन सुरू आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी जागा वाढवण्यासोबतच आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. कर्करोगासाठी स्वतंत्र रुग्णालये उभारण्याचाही सरकारचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन संशोधन, सहकार्य आणि आरोग्य क्षेत्रातील नवकल्पनांना चालना देण्यासाठी अशा परिषदांचे महत्त्व अधोरेखित करत, वैद्यकीय पर्यटनालाही प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
Powered By Sangraha 9.0