वेध
प्रफुल्ल व्यास
Gas cylinder-fuel shutdown rumours गेल्या काही वर्षांत आपल्या दैनंदिन आयुष्यात एका गोष्टीने अत्यंत वेगाने प्रवेश केला ती म्हणजे‘अफवा!’. या वेग इतका प्रचंड आहे की त्या सत्यापेक्षा आधी पोहोचतात आणि परिणामही करून जातात. युद्धामुळे उद्यापासून पेट्रोल, डिझेल मिळणार नाही, गॅस सिलेंडर बंद होणार अशा प्रकारचे संदेश वार्यासारखे समाजात पसरतात आणि भीती निर्माण होते. या भीतीचा परिणाम मानसिक, आर्थिक, सामाजिक तर होतोच शिवाय व्यवस्था, व्यवस्थापनावरही होतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्ध सुरू आणि लगेच तेल आयात बंद होणार, ज्वलनशील पदार्थांचे दर दुप्पट होणार, साठा संपणार हे पेरलं जातं. त्यानंतर व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी त्याच्या दिमतीला हजरच असते. ‘सीपी’ अॅण्ड ‘एफडब्ल्यू’ (एकाचं दुसर्याला चिकटवणं आणि पुढे ढकलणं)च्या माध्यमातून ते काही तासांतच लाखोंपर्यंत पोहोचलेलं असतं. तेल आयात केलं जातं. ही वस्तुस्थिती खरी असली तरी भारतात पेट्रोल संपणार आहे. शासकीय आणि प्रशासकीयदृष्ट्या साधारणत: ७० ते ९० दिवस पुरेल इतका धोरणात्मक साठा उपलब्ध असतो. याशिवाय सार्वजनिक आणि खाजगी कंपन्यांचे वेगळे साठे असतातच. त्यामुळे उद्या पेट्रोल संपणार ही अफवा ठरते. गॅसच्या बाबतीतही परिस्थिती फार वेगळी नाही.
देशातील सुमारे ९० टक्क्यांपेक्षा जास्त घरांमध्ये स्वयंपाकासाठी एलपीजी गॅसचा वापर होतो. लाखो वितरकांच्या माध्यमातून गॅस पोहोचवतात. वाहतूक व्यवस्था वा अन्य नैसर्गिक अडचणींमुळे टंचाई, अनियमितता होऊ शकते. मात्र, अफवांमुळे लोक अतिरिक्त सिलेंडर बुक करतात, साठवणूक करतात आणि यामुळेच काही ठिकाणी कृत्रिम टंचाई निर्माण होते. राज्यात गेल्या दोन दिवसांत हेच अनुभव येत आहेत. आता गॅस मिळणार नसल्याची चर्चा सुरू झाली आणि गॅस पुढे रिकामे सिलेंडर घेऊन रांगा लागल्या. ज्यांच्याकडे दोन कनेक्शन आहेत त्यांनी अतिरिक्त सिलेंडर मिळवण्यासाठी ‘जुगाड’ लावणे सुरू केले. वास्तविक व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठ्याविषयी शासनाने धोरण ठरवले आहे. घरगुती वापराचे सिलेंडर उपलब्ध आहेत. फक्त त्यासाठी ठरावीक मुदत देण्यात आली. सिलेंडरची ‘आग’ शांत होत नाही तोच सोमवारी दुपारपासून सर्वत्र पेट्रोल संपल्याची अफवा आणि पेट्रोप पंपांपुढे वाहनांच्या रांगा लागल्या. मग, पेट्रोल तरी किती भरून घ्यायचं तर ते आवश्यकेपेक्षा जास्त आणि वाहनात पेट्रोल आहे म्हणून वीक एन्ड म्हणून ‘लाँग ड्राईव्ह’ जाऊन यायचं!
Gas cylinder-fuel shutdown rumours अफवांचा परिणाम कोरोना काळात अनुभवला. टाळेबंदी जाहीर होताच लोकांनी किराणा, औषधं, सॅनिटायझर, मास्क महिनाभराचा साठा घरात भरून ठेवला. परिणामी, दुकानांमध्ये तात्पुरती निर्माण झाली. सोशल मीडियाच्या वाढता वापर आणि २४ तास बातम्यांच्या ओढाताणीत अफवांचा वेग सूर्यकिरणांपेक्षा काही पटीने पसरतो आहे. व्हॉट्सअॅपवर दररोज अब्जावधी संदेशांची देवाणघेवाण होते. एका अभ्यासानुसार, भारतात व्हायरल होणार्या संदेशांपैकी सुमारे ३० टक्के संदेश हे अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीवर आधारित असतात. यातील मोठा भाग हा इकडचे तिकडे करण्याचा असतो. पाठवणारी व्यक्ती नात्यातली, ओळखीची, मित्र असेल तर त्यावर सहज विश्वास ठेवला जातो आणि ती माहिती पुढे पाठवली जाते. काही वेळा टीआरपी आणि ब्रेकिंगच्या स्पर्धेत मोठा धक्का!, संकटाची घंटा!, संपणार का इंधन? अशी वाक्ये भीती वाढवतात. याची कल्पना सांगणार्याला नसते. सरकार आणि अधिकृत यंत्रणांनी पुरेसा साठा असल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र, माहिती थंड असते आणि अफवा गरम होते. व्हॉट्सअॅपवर पसरलेल्या अफवांमुळे काही ठिकाणी हिंसक घटना घडल्याचे अनेक उदाहरणे आहेत. अफवांचा आवाज दाबण्यासाठी सरकारच्या काही उपाययोजना आहेत. माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत खोटी माहिती पसरवणार्यांवर कारवाई केली जाते. परंतु, त्याची संख्या फारच कमी आहे.
Gas cylinder-fuel shutdown rumours अफवा पसरविण्याचा शोध घेताना पोलिस प्रशासनाला तक्रारींची गरज भासते. ज्याने कोणाच्या धार्मिक, सामाजिक वा वैयक्तिक भावना दुखावत नाहीत तोपर्यंत कोणी पोलिसात जात नाही. त्यामुळे अशा अफवा पसरविणार्यांवर कारवाईसाठी पोलिस प्रशासनाने ‘सुमोटो’चा वापर केला पाहिजे. परंतु, जोपर्यंत या अफवांचे गंभीर परिणाम झाल्याचे पोलिसांना दिसत नाही, त्याची तक्रार येत नाही तोपर्यंत काहीच कारवाई केली जात नाही. तक्रार येत नाही अन् पसरविणार्यांवर कारवाईही होत नाही. त्यामुळे अफवांसाठी रान मोकळे होते. त्यातही राजकीय विरोधक सरकार विरोधात सामान्य माणसांच्या भावना भडकवण्यासाठी अशा अफवा पसरविण्यात धन्यता मानतात. अफवा ही लाट आहेती येते आणि जाते. पण, तिच्यामुळे आपण बुडायचं की तिला पलटवून लावायचं हे आपल्यालाच ठरवायचं आहे. जे काही ते ठरवा... पण, अफवांचे बळी नका म्हणजे झाले...
९८८१९०३७६५