नागपूर,
itwari-motibag-broad-gauge-railway-line : रेल्वेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात झोपड्या असल्याने रेल्वेच्या विकास कामांना अडथळा निर्माण झाला आहे. इतवारी-मोतीबाग ब्रॉडगेज रेल्वेमार्ग अतिक्रमणांच्या विळख्यात सापडल्याने गत सहा वर्षांपासून रेल्वेचे कामांना विलंब होत आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वेने अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली होती. मात्र अद्याप रेल्वे मार्गावर अद्याप मोठ्या प्रमाणात झोपड्या कायम असल्याने रेल्वेची डोकेदुखी वाढली. मुख्यत: २०१९ मध्ये मंजूर झालेल्या व सुमारे ३.५ किमी लांबीच्या या प्रकल्पासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाकडून जमीन मोकळी करण्याचे प्रयत्न होत आहेत.

रेल्वेच्या या प्रकल्पासाठी अतिक्रमण हटवा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशी नोटीस बजाविण्यात आली आहे. मोतीबाग व डोबीनगर परिसरातील अतिक्रमणधारकांनी स्वेच्छेने जागा मोकळी करून सहकार्य करावे, आवाहन दक्षिण पूर्व मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे. रेल्वे मार्गावरील संबंधितांना या पूर्वीच नोटिसा देऊन मुदत देण्यात आली होती. काही ठिकाणी कारवाईही पूर्ण झाली आहे. उर्वरित अतिक्रमण हटवण्यासाठी टप्याटप्प्याने मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे. यानंतर रेल्वेकडून निर्धारित वेळेनंतर नियमानुसार कारवाई केल्या जाणार इशारा रेल्वे प्रशासनाने दिला आहे.
अतिक्रमणधारकांना पूर्वसूचना
सध्या या मार्गावर रेल्वे गाड्यांना तांत्रिक अडचणी जाणवत आहेत. इतवारी, नागपूर रेल्वेस्थानकावरील प्रवासी ताण कमी करून रेल्वे क्षमतेत वाढ करण्यासही हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. रेल्वे प्रशासनाने अतिक्रमणधारकांना पूर्वसूचना देत तातडीने जागा रिकामी करण्यासाठी मुदत दिली होती. इतवारी-नागपूर मार्गावरील रेल्वे वाहतूक अधिक व वेळेवर होण्याची अपेक्षा आहे.