कथाकथनाच्या संकल्पनांना एआय बनवेल अधिक रंजक

27 Mar 2026 21:38:58
नागपूर,
nagpur-film-festival : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) कथाकथनाच्या संकल्पनांना अधिक रंजक बनवू शकते, मात्र कथांची मूळ कल्पना ही मानवीच असावी, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. नागपूर चित्रपट महोत्सवअंतर्गत आयोजित चलचित्र कार्यशाळेत या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली.
 

nagpur-chitrapat-mahotsav 
 
 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि नागपूर चलचित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ ते २९ मार्चदरम्यान जमनालाल बजाज प्रशासकीय भवनात महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दिनांक २७ मार्च रोजी कोटा श्रीनिवास सभागृहात ‘एआय सह कथाकथनाचे भविष्य’ या विषयावर कार्यशाळा पार पडली.
 
या कार्यशाळेला मिक्सिओचे सीईओ अजिंक्य टाकावाले, सीटीओ कौस्तुभ अग्रवाल तसेच तज्ज्ञ पियुष अग्रवाल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी चित्रपटसृष्टीत एआयचा वाढता वापर आणि त्याचे परिणाम यावर प्रकाश टाकला.
 
तज्ज्ञांनी सांगितले की, एआय स्वतःहून सर्जनशील कल्पना निर्माण करू शकत नाही. त्यामुळे कथालेखनाची मूलभूत संकल्पना ही लेखकाच्या विचारातूनच यावी. मात्र, कथेला अधिक प्रभावी व रंजक बनवण्यासाठी एआयचा उपयोग सहाय्यक साधन म्हणून करता येतो.
 
पियुष अग्रवाल यांनी विशेषत्वाने नमूद केले की, कथा लेखनातील समस्या, गुंतागुंत आणि भावनिक पैलू हे मानवी अनुभवांवर आधारित असतात, जे एआय पूर्णपणे समजू शकत नाही. त्यामुळे नवोदित लेखकांनी स्वतःच्या कल्पनाशक्तीवर भर द्यावा.
 
कार्यक्रमात रवींद्र हरदास, जय गाला व अजय राजकारणे यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले. कार्यशाळेला चित्रपटप्रेमी आणि लेखकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
Powered By Sangraha 9.0