चंद्रपूर,
policemans-father-murdered : प्रेमसंबंधाला विरोध करणार्या पोलिस पित्याची, हवालदार प्रियकराच्या मदतीने, हवालदार मुलीनेच विष देऊन हत्या केल्याची खळबळजनक घटना चंद्रपुरात तब्बल तीन वर्षांनी उघडकीस आली. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी एका विधी संघर्षग्रस्त बालकासह चार जणांना अटक केली आहे.
जयंत अशोक बाल्लावार असे मृत पित्याचे नाव आहे. तर आरोपी प्रियकर हवालदार आशिष महेश शेडमाके (30, रा. जुना सुमठाणा, भद्रावती), हवालदार मुलगी आर्या जयंत बाल्लावार (22, रा. चंद्रपूर), चैतन्य ऊर्फ मोंटी सचिन गेडाम (22, रा. नवीन सुमठाणा, भद्रावती) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
आशिष शेडमाके याच्याशी आर्याचे 2012 पासून प्रेमसंबंध होते. या संबंधाला वडिलांचा तीव्र विरोध होता. त्यावरून घरात वारंवार वाद होत असत. त्यामुळे वडिलांचा काटा काढण्यासाठी आर्या आणि आशिष यांनी विषप्रयोग करण्याचा कट रचला. आशिष शेडमाके याने त्याच्या विधी संघर्षग्रस्त मावसभाऊ चैतन्य ऊर्फ मोंटी गेडाम याच्याकडून 5 हजार रुपयांत विषाची बाटली विकत घेतली. 24 मार्च 2023 रोजी आशिषने आर्याकडे विष दिले. 25 मार्च रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास आर्याने वडिलांना मिल्कशेकमध्ये विष मिसळून प्यायला दिले. ते प्यायल्यानंतर जयंत बाल्लावार कर्तव्यावर गेले असता, त्यांना चक्कर येऊन ते खाली पडले. जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी चौघांविरुद्ध कलम 302, 120-बी, 201, 34 अन्वये गुन्हा दाखल केला.
जयंत बाल्लावार यांच्या मृत्यूच्या एक महिन्यानंतर आशिष व आर्याने प्रेमविवाह केला. जयंत बाल्लावार हे शासकीय नोकरीवर असल्याने आर्याही अनुकंपा तत्त्वावर पोलिस कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाली. पासिंग आऊट परेड झाल्यानंतर आर्या घरी परत येणार होती. त्यामुळे त्याने घरी स्वागताचे नियोजन केले होते. मात्र, ती परेड झाल्यानंतर सासरी जाण्याऐवजी माहेरी गेली. त्यामुळे आशिष रागावला होता.
आशिष पोलिस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असताना त्याची दोन-तीन वादग्रस्त प्रकरणे पुढे आली होती. त्यामुळे पोलिस अधीक्षकांनी त्याला बडतर्फ केले होते. त्याच्या बडतर्फीमागे आर्याचा हात असल्याचा त्याला संशय होता. त्यातच ती पासिंग आऊट परेड होऊन सासरी न येता माहेरी गेल्याने तो संतापला होता. त्यामुळे त्याने 25 मार्चला पोलिसांत तक्रार केली.
रात्री महिला आरोपीला अटक करता येत नसल्याने ठाणेदार आसिफराजा शेख, सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी वाकडे, पोलिस उप निरीक्षक कृष्णा दरडे यांनी न्यायाधीशांच्या रीतसर परवानगी घेऊन सर्वांना अटक केली.