आता लढाई हमीभावाची : बच्चू कडू

27 Mar 2026 21:33:11
अमरावती, 
bachchu-kadu : शेतकरी कर्जमाफीच्या लढ्याला नवा आणि सकारात्मक अर्थ देत प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाची सुरुवात शुक्रवारी रक्तदानासारख्या समाजोपयोगी उपक्रमाने करण्यात आली. या उपोषणाच्या निमित्ताने कर्जमाफीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकरी व सहकार्‍यांचा विशेष सन्मान करण्यात आला. आंदोलनातून उभ्या राहिलेल्या शेतकरी ऐक्याला यावेळी मानाचा मुजरा करण्यात आला.
 

bachchu-kadu 
 
 
 
या कार्यक्रमाला महादेव जानकर, विजय जावंधीया आणि वामनराव चटप यांची प्रमुख उपस्थिती होती. आंदोलनाच्या काळातील संघर्षमय आठवणींना उजाळा देत, शेतकरी प्रश्नांवर पुढील लढ्याची दिशा देखील स्पष्ट करण्यात आली. यावेळी कर्जमाफीच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी असणारे परभणी जिल्ह्यातील दिव्यांग बांधव सूर्यभान मारोती ढगे यांची रक्ततुला करण्यात आली. तसेच आंदोलनांमध्ये सातत्याने कार्यकर्त्यांची सेवा करणारे, थकलेल्या आंदोलकांची काळजी घेणारे संजय गोमकाळे यांची बीजतुला करून सन्मान करण्यात आला.
 
 
ज्या कार्यकर्त्यांनी मला साथ दिली, मोठं केलं त्या कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठीच मी आज रक्तदान केलं, असे म्हणताना बच्चू कडू भावूक झाले. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी ऑगस्ट महिन्यात ९ तारखेला मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. आगामी काळात शेतकरी प्रश्नांवर अधिक आक्रमक भूमिका घेत लढा तीव्र केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सांगितले की, आता पुढील लढा थेट केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांना घेरून लढला जाईल. कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांनी आंदोलनाची दिशा स्पष्ट करत, या लढ्यात प्रतीकात्मक स्वरूपात प्रभू श्रीरामांचा धनुष्यबाण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तलवार सोबत घेऊन जाणार असल्याचेही सांगितले. ९ तारखेला उभारण्यात येणारा हा लढा शेतकर्‍यांच्या मालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी निर्णायक ठरणार असल्याचा विश्वासही बच्चू कडू यांनी व्यक्त केला.
Powered By Sangraha 9.0