विद्यानगरातील महीलांना करावा लागतोय पाणी टंचाईचा सामना

27 Mar 2026 21:05:18
धानोरा, 
water-scarcity-dhanora : धानोरा शहरातील विद्यानगर वार्डात महीलांना पाणी टंचाईचा तीव्र सामना करावा लागत असून सौर उर्जेवर चालणार्‍या पाण्याच्या टाकीमधून नळाला नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी विद्यानगर वार्डातील महिलांनी धानोरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
 
 
निवेदनात म्हटले आहे की, धानोरा नगरपंचायत येथील प्रभाग क्रमांक एक मध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी दुहेरी लघु नळ पाणीपुरवठा योजना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत 2023-24 मध्ये सौर ऊर्जेवर उभारण्यात आली. मात्र ती निष्क्रिय असल्याने तत्काळ दुरूस्ती करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा विद्यानगरातील नागरिकांनी दिला आहे.
 
 
धानोरा येथील विद्यानगर वार्डात नगरपंचायतमार्फत सौर उर्जेवर चालणारी पाण्याची टाकी अंगणवाडीला लागून उभारण्यात आलेली आहे. परंतू जेव्हापासून सौर उर्जेवर पाण्याची टाकी लावली, त्या दिवशी फक्त नळाला पाणी आले. त्यानंतर मात्र पाणी टाकीत भरत असण्याचा आवाज येतो पण नळाला पाणी येत नाही. मग पाणी जातो कुठे, याचा शोध नगरपंचायतने कधीच घेतला नाही आणि आतापर्यंत कोणालाही कळले नाही. त्यामुळे त्या दिवसापासून सदर टाकीमधून नळाला पाणी पुरवठा होत नसल्यामुळे येथील नागरीकांना तिव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
 
 
लोकांना पाणी पुरवठा होत नसल्याबाबत अनेक वेळा संबंधीत कर्मचारांच्या निर्देशनास आणून दिले असतांनाही संबंधित विभागाने अजूनपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. शासनाच्या निधीतून उभारेली ही योजना निस्क्रिय अवस्थेत पडून असून नागरिकांना त्याचा कोणताही फायदा मिळत नाही, ही अत्यंत गंभीर व खेदजनक बाब आहे.
 
 
पिण्याच्या पाण्यासारख्या मुलभुत सुविधेबाबत नगरपंचायतीचे होणारे दुर्लक्ष नागरिकांसाठी अत्यंत त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे महिलांना व नागरिकांना उन्हाळयामध्ये टँकरवर व दुरवरून पाणी आणण्याची वेळ येईल. याचा नाहक त्रास प्रभाग क्रमांक 1 मधिल लोकांना सहन करावा लागत असल्याने वार्डात प्रशासनाप्रती संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन सौर उर्जेवर चालणार्‍या पाण्याच्या टाकीची पाहणी करून सात दिवसांच्या आत नळाला नियमीत पाणी पुरवठा सुरू करावा, अन्यथा विद्यानगर वार्डातील महिला व नागरिकांतर्फे नगरपंचायत कार्यालयासमोर मडका फोड आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अर्चना भाविकदास करमनकर, यशोधरा हुमने, सिमा भजनसव हलामी, सुनंदा हलामी, कल्याणी घोडमारे, निराशा ननावरे, रूपाली कोल्हटकर, रश्मी बन्सोड, शीतल कुंभारे, माधुरी भोयर, कल्याणी मंगेश बीडमार, रश्मी ज्ञानेश बन्सोड, शुशिल मेश्राम, संतोष शेडमाके, स्वप्निल गावडे, कुसुम चंद्रकांत मने, सिंधु पाल, कुसुम मने यांनी निवेदनातून दिला आहे.
 
 
यासंदर्भात नगरपंचायत उपाध्यक्ष ललित बरछा यांना विचारले असता, प्रभाग क्रमांक 1 मधिल सौर ऊर्जेवर चालणार्‍या पाण्याच्या टाकीचा प्रश्‍न लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
 
Powered By Sangraha 9.0