हैद्राबाद,
12th century statue of Lord Vishnu तेलंगणामध्ये एका नदीत सापडलेल्या भगवान विष्णूच्या प्राचीन मूर्तीमुळे १२ व्या शतकाचा इतिहास उलगडला आहे. भूपालपल्ली जिल्ह्यातील कटाराम मंडळातील चिंथकनी गावाजवळ एका नदीत नदीत गाडलेली ही मूर्ती आढळली. तज्ज्ञांच्या मते, ही मूर्ती १२ व्या शतकातील असून काकतीय काळातील उत्कृष्ट कलाकुसर दर्शवते. स्थानिक उत्खननादरम्यान नदीकिनारी असलेल्या वनक्षेत्रात ही दुर्मिळ मूर्ती सापडली. सांस्कृतिक आणि वारसा संशोधन पथकाचे सचिव अरविंद पाकिडे यांनी सांगितले की, ही मूर्ती त्या काळातील उच्च दर्जाच्या शिल्पकलेची साक्ष आहे. मूर्तीचे काही भाग खराब झाले आहेत; त्यामुळे तेलंगणा वारसा विभागाने तिची औपचारिक नोंदणी करून जतन करण्याची गरज आहे.
यापूर्वीही दिसला होता मूर्तीच्या डोक्याचा भाग
रंजक बाब म्हणजे, सुमारे तीन वर्षांपूर्वी नदीची पातळी कमी झाल्यावर स्थानिकांना मदारम गावाजवळील पेड्डावागू ओढ्याच्या वाळूत मूर्तीच्या डोक्याचा भाग आढळला होता. तेव्हापासून मूर्ती नदीत गाडलेली होती, परंतु अलीकडेच पाणी कमी झाल्यामुळे संपूर्ण मूर्ती दिसू लागली. तेलंगणा राज्य पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डी. बुज्जी यांनी सांगितले की, स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्यांना कटारम मंडळातील मूर्तीची तपासणी करून तिच्या स्थलांतराचा निर्णय घेता येईल. माध्यमांच्या वृत्तानुसार, काळ्या ग्रॅनाइटमध्ये कोरलेली ही मूर्ती अंदाजे पाच फूट उंच आहे. नाक आणि बोटांना किंचित इजा झाली असली तरी मूर्तीचा बहुतेक भाग सुरक्षित आहे. या शोधामुळे तेलंगणाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशावर प्रकाश पडतो आणि भावी पिढ्यांसाठी प्राचीन कलावस्तूंचे जतन का महत्त्वाचे आहे, हे दिसून येते.