समृद्धी महामार्गावरील आपत्कालीन यंत्रणा कुचकामी
कारंजा लाड,
Accident on Samriddhi Highway समृद्धी महामार्गावरील आपत्कालीन यंत्रणेमधील ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे एका ट्रक चालकाला आपला जीव गमवावा लागला. ही घटना २८ मार्च रोजी पहाटे घडली. यावेळी अपघात झाल्याने ट्रक चालक केबिन मध्ये अडकला. त्यामुळे आपत्कालीन यंत्रणेच्या ठेकेदाराला क्रेन ची मदत मागितली. परंतु संबंधित ठेकेदाराने डिझेल नसल्याचे कारण दिले.त्यामुळे केबिन मधील ट्रक चालकाला बाहेर काढण्यास उशीर झाला.परिणामी त्याचा मृत्यू झाला. चैनल क्रमांक १९७, मुंबई कॉरिडॉर वर शनिवार २८ मार्च रोजी पहाटे हा अपघात घडला. यात एका ट्रक चालकाचा मृत्यू झाला असून दुसरा चालक गंभीर जखमी झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, रात्री सुमारे २ वाजताच्या दरम्यान पी. बी. ०५ ए. पी. ९२४२ क्रमांकाचा ट्रक नागपूरहून मुंबईकडे जात असताना त्याचा डिझेल पाईप फुटल्याने ट्रक वेगवान लेनमध्येच बंद पडला. चालकाने वारंवार समृद्धी हेल्पलाईनवर संपर्क साधून मदतीची आणि बॅरिकेट लावण्याची विनंती केली. मात्र, दीर्घकाळ कोणतीही मदत घटनास्थळी पोहोचली नाही. दरम्यान, चालकाने स्वतः रस्त्यावर उभे राहून इतर वाहनांना हातवारे करून अपघात टाळण्याचा प्रयत्न केला. तरीही सकाळी सुमारे ५ वाजता एम. एच. १४ एच. यू. ३२९२ क्रमांकाचा दुसरा ट्रक मागून धडकला आणि भीषण अपघात झाला. या धडकेत चालक केबिनमध्ये अडकून गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच कारंजा ग्रामीण पोलिस, १०८ रुग्णवाहिका (डॉ. गणेश व पायलट) घटनास्थळी दाखल झाले. मात्र, जखमी चालकाला बाहेर काढण्यासाठी क्रेनची गरज असताना संबंधित ठेकेदाराने क्रेनमध्ये डिझेल नाही असे कारण देत उशीर केल्याचा आरोप होत आहे. वेळेत मदत मिळाली असती तर चालकाचा जीव वाचू शकला असता, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या अपघातात फुलचंद यादव (वय ३०, रा. आझमगड, उत्तर प्रदेश) यांचा मृत्यू झाला असून अरविंद यादव (वय २९) हे गंभीर जखमी आहेत.
Accident on Samriddhi Highway घटनेनंतर श्री गुरु रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत समृद्धी प्रशासनाशी संपर्क साधत बॅरिकेट न लावल्यामुळे अपघात होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. संबंधित ठेकेदारावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. स्थानिकांकडून असा आरोप करण्यात येत आहे की, समृद्धी महामार्गावर अनेकदा नादुरुस्त वाहने वेगवान लेनमध्येच उभी राहतात, मात्र वेळेवर बॅरिकेट किंवा मदत मिळत नाही. त्यामुळे वारंवार अपघात होऊन चालकांना जीव गमवावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्ग प्रशासनाने तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.