हापूस आंब्याची पहिली खेप अमेरिकेसाठी रवाना

28 Mar 2026 16:56:27
नवी मुंबई
mango कोकणातील हापूस आंब्याच्या यंदाच्या हंगामाला सुरुवात झाली असून अमेरिकेकडे पहिली निर्यात खेप मुंबई विमानतळावरून हवाई मार्गाने रवाना करण्यात आली आहे. मात्र, वाढत्या हवाई वाहतूक खर्चामुळे निर्यातदारांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले असून या पार्श्वभूमीवर शासनाच्या हस्तक्षेपाची मागणी जोर धरत आहे.
 

mango  
नवी मुंबईतील वाशी mango एपीएमसी बाजारातून सुमारे १२०० किलो, म्हणजेच ४४० पेट्या हापूस आंब्याची पहिली खेप अमेरिकेला पाठवण्यात आली. यानंतरही पुढील काही दिवसांत अशाच प्रमाणात आणखी खेपा पाठवण्याचे नियोजन असल्याची माहिती निर्यातदारांनी दिली. यंदा आखाती प्रदेशातील तणावामुळे समुद्री मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे निर्यातदारांना हवाई मार्गाचा पर्याय स्वीकारावा लागत असून त्यामुळे खर्चात मोठी वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने विमान वाहतूक दर झपाट्याने वाढले असून त्यामुळे निर्यात आर्थिकदृष्ट्या कठीण होत असल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे. हवाई मालवाहतूक दरांमध्ये मोठी वाढ झाल्याचेही समोर आले आहे. काही प्रकरणांमध्ये हे दर प्रति किलो सुमारे ३५० रुपयांवरून ६०० रुपयांपर्यंत पोहोचले असल्याने निर्यातदारांच्या नफ्यावर मोठा परिणाम होत आहे.दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय हापूस आंब्याला मेक्सिको आणि पेरू या देशांकडून तीव्र स्पर्धा मिळत आहे. वाढत्या किमतीमुळे परदेशातील ग्राहकांचा कल अन्य देशांकडे वळण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. तरीही अमेरिकेसारख्या बाजारपेठेत हापूसची मागणी कायम असल्याने निर्यात सुरू ठेवणे आवश्यक असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
 
 
अमेरिका हा भारतीय आंब्याचा mango सर्वात मोठा आयातदार देश असून प्रीमियम दर्जाच्या हापूसला तेथे मोठी मागणी आहे. मात्र, वाढत्या खर्चामुळे या मागणीचा पूर्ण लाभ शेतकरी आणि निर्यातदारांना मिळेल का, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीत केंद्र व राज्य शासनाने हवाई वाहतूक दर कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, तसेच निर्यातदारांना सवलती आणि प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी पुढे येत आहे. अन्यथा, हापूस आंब्याच्या निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0