वॉशिंग्टन,
Mojtaba Khamenei is not alive अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणच्या नेतृत्वाबाबत मोठा दावा करत खळबळ उडवली आहे. त्यांनी म्हटले आहे की, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनाई आता जिवंत नाहीत. मियामी येथे झालेल्या एका महत्त्वाच्या परिषदेत बोलताना ट्रम्प यांनी असा दावा केला की, अमेरिकेच्या लष्करी कारवाईमुळे इराणची सर्वोच्च नेतृत्वव्यवस्था आणि संरक्षण यंत्रणा पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे.
ट्रम्प यांच्या मते, अलीकडील हल्ल्यांमध्ये मोजतबा खामेनाई यांचा मृत्यू झाला असून त्यामुळे इराणमध्ये नेतृत्वाचा अभाव निर्माण झाला आहे. त्यांनी असेही सांगितले की, इराणमधील अनेक वरिष्ठ नेते या कारवाईत ठार झाले असून सध्या तेथील स्थिती अत्यंत अनिश्चित आहे. यापूर्वीही त्यांनी खामेनी यांच्या स्थितीबाबत शंका व्यक्त करत ते सार्वजनिकरित्या का दिसत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला होता.
पुन्हा एकदा चर्चा सुरु
दरम्यान, अली खामेनाई यांच्या निधनानंतर मोजतबा यांना उत्तराधिकारी मानले जात असल्याची चर्चा होती, मात्र त्यानंतर ते सार्वजनिकरित्या समोर न आल्याने विविध तर्कवितर्क सुरू झाले होते. ट्रम्प यांच्या ताज्या विधानामुळे या चर्चांना आणखी उधाण आले आहे. आपल्या भाषणात ट्रम्प यांनी इराणच्या लष्करी क्षमतेवरही कठोर टीका केली. त्यांनी दावा केला की, इराणचे नौदल, हवाई दल आणि संरक्षण व्यवस्था मोठ्या प्रमाणावर निष्प्रभ करण्यात आली आहे. तसेच शस्त्रसाठा, क्षेपणास्त्र आणि मानवरहित विमान निर्मितीशी संबंधित केंद्रांनाही मोठा फटका बसल्याचे त्यांनी सांगितले. या वक्तव्यांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इराणकडून यावर काय प्रतिक्रिया येते आणि प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.