पाकिस्तानात इंधनफडवग संपतंय; अर्थव्यवस्था कोलमडण्याच्या मार्गावर

28 Mar 2026 11:16:35
इस्लामाबाद,
Pakistan's economy collapse पाकिस्तानसध्या गंभीर आर्थिक संकटाच्या भोवऱ्यात अडकला असून परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. देश केवळ मंदीपुरता मर्यादित न राहता व्यवस्थेच्या अपयशाच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे चित्र दिसत आहे. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा थेट परिणाम पाकिस्तानच्या ऊर्जा पुरवठ्यावर झाला असून इंधनटंचाई तीव्र झाली आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून लादलेल्या कठोर अटींमुळे सामान्य नागरिकांवर प्रचंड आर्थिक ताण पडत आहे.
 
 

Pakistan 
लाहोर आणि कराचीसारख्या मोठ्या शहरांमध्ये अनेक पेट्रोल पंपांवर साठा संपल्याचे फलक लावण्यात आले असून लोकांना इंधनासाठी तासन्तास रांगा लावाव्या लागत आहेत. अवघ्या काही दिवसांत पेट्रोलच्या दरात मोठी वाढ झाली असून त्यामुळे नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरवाढीचा थेट फटका पाकिस्तानला बसत आहे. परकीय चलनसाठा अत्यल्प असल्याने नवीन इंधन आयात करणेही कठीण झाले आहे. उपलब्ध माहितीनुसार, देशाकडे मर्यादित दिवसांचा इंधनसाठा उरला आहे.
 
दोन वेळचे अन्न मिळवणेही कठीण
ऊर्जा टंचाईमुळे उद्योगधंदे ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. वीजपुरवठ्यातील खंड आणि कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. शेती क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसला असून खतांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. डिझेलच्या तुटवड्यामुळे पिकांच्या कापणीवर परिणाम होत असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत.दरम्यान, महागाईने विक्रमी पातळी गाठली आहे. रोजच्या वापरातील अन्नधान्याच्या किमती गगनाला भिडल्या असून सामान्य कुटुंबांसाठी दोन वेळचे अन्न मिळवणेही कठीण झाले आहे. मोठ्या प्रमाणावर लोकांना आवश्यक अन्नघटक मिळत नसल्याचा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे.
 
येणारे दिवस आणखी कठीण होणार
आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पाकिस्तानला परदेशी मदतीवरच अवलंबून राहावे लागत आहे. अनेक वर्षांपासून कर्जावर चालणाऱ्या अर्थव्यवस्थेवर आता प्रचंड बोजा वाढला आहे. मिळणाऱ्या आर्थिक मदतीपैकी मोठा हिस्सा जुन्या कर्जफेडीत खर्च होत असल्याने नव्या उपाययोजना करण्यासाठी फारसा निधी उरत नाही.अलीकडेच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर सरकारसमोर पर्याय अत्यंत मर्यादित असल्याचे स्पष्ट झाले आहे. आखाती देशांकडून तातडीने मदत न मिळाल्यास येणारे दिवस आणखी कठीण ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाढती बेरोजगारी, अन्नटंचाई आणि आर्थिक अस्थिरता यामुळे देशात असंतोष वाढत असून सामाजिक तणावही वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
Powered By Sangraha 9.0