एक कोटीची मंजूरी; भूमिपूजनही झाले तरीही वाट बिकट

28 Mar 2026 18:34:30
अर्जुनी मोरगाव- तावशी बायपास रस्त्याच्या कामाचा मुहूर्त सापडेना
परिसरात नाराजीचे सूर

अर्जुनी मोरगाव, 
येथील अर्जुनी मोरगाव ते Tavshi bypass road case तावशी बायपास या ४०० मीटरच्या रस्त्याच्या बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी मिळाली. आ. राजकुमार बडोले यांच्या हस्ते थाटामाटात भूमिपूजनही झाले. मात्र, संबंधित कंत्राटदाराकडून या रस्त्याच्या बांधकामाचा श्रीगणेशाच करण्यात आला नाही. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून या रस्त्याची वाट बिकट झाली आहे. परिणामी परिसरातील नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले असून शासन आणि प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
 
 
road
 
अर्जुनी मोरगाव ते तावशी हा Tavshi bypass road case  बायपास मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या अवस्थेवर अश्रू ढाळत आहे. संपूर्ण रस्ता खड्डेमय झाल्याने या मार्गावर नेहमीच अपघाताच्या घटना पुढे येत आहेत. दरम्यान, या रस्त्याच्या बांधकामाला गेल्या वर्षी मंजूरी प्रदान करून बांधकामासाठी १ कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला. या अनुषंगाने गत १७ नोव्हेंबर २०२५ रोजी आ. इंजि. राजकुमार बडोले यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात भूमिपूजनही करण्यात आले. मात्र भूमिपूजनाचा नारळ फुटून पाच महिने उलटले तरी संबंधित कंत्राटदाराने कामाला सुरवात केली नाही. परिणामी या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून ये-जा करणार्‍या अवजड व इतर वाहनामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. विशेषतः ही धूळ थेट रस्त्यालगत असलेल्या घरांमध्ये शिरत असल्याने येथील नागरिकांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. लहान मुले आणि वृद्धांना श्वषणाचे त्रास जाणवु लागले आहे. घरातील वस्तू आणि खाद्यपदार्थांवर धुळीचे थर साचत असल्याने महिला वर्गातही संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, संबंधित कंत्राटदार काम करण्यास सक्षम नसेल तर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दुसर्‍या कंत्राटदाराची नियुक्ती करून हे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे अशी मागणी जोर धरत आहे.
 
 
ती तिव्र आंदोलन...
वारंवार विनंती करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने आता नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही तर सबंधित कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. विशेष म्हणजे, आमदारांनी भूमिपूजन केल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली की, नाही याची सहनिशा करणे गरजेचे होते. मात्र, तसे काहीही झाले नसल्याने दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0