बोर व्याघ्र प्रकल्पात आढळले हिमालयीन गिधाड

29 Mar 2026 19:46:27
घिरट्या घालताना केले कॅमेराबद्ध
 
वर्धा, 
Bor Tiger Reserve: Himalayan Vulture बोर व्याघ्र प्रकल्प केवळ वाघ व इतर प्राण्यांसाठीच नव्हे तर पक्ष्यांच्या विविधतेसाठीही ओळखला जातो. अशा या बोर व्याघ्र प्रकल्पाच्या जंगल सफारीचा आनंद लुटण्यासाठी २८ मार्चला गेलेल्या एका पर्यटकाला चक हिमालयीन गिधाड घिरट्या मारताना दिसले. त्यास या पर्यटकाने कॅमेराबद्धही केले. जिल्ह्यात प्रथमच हिमालयीन गिधाडाची नोंद घेण्यात आल्याने निसर्गप्रेमींमध्ये आनंद संचारला आहे.
 
 
Himalayan Vulture
 
बहार नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. बाबाजी घेवडे हे त्यांच्या परिवारासोबत बोर व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीचा आनंद लुटण्यासाठी २८ मार्चला गेले होते. यावेळी त्यांना उंच आकाशात गिधाड सदृश्य पक्षी घिरट्या घालताना दिसला. त्यांनी या पक्ष्याचे काही छायाचित्र काढले. त्यानंतर त्यांनी जीवशास्त्रज्ञ दर्शन दुधाने यांच्याशी याविषयी चर्चा केली असता प्रथमदर्शनी भारतीय गिधाड असल्याचा अंदाज आला. यामागील कारण म्हणजे गेल्या तीन वर्षात बोर व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात भारतीय गिधाड आढळून आले आहे. शिवाय असे अनेक गिधाड बीएनएचएस या संस्थेच्या मदतीने पेंच व्याघ्र प्रकल्पातून सोडल्या गेले आहे. तसेच त्यातील काही गिधाड स्थलांतर करीत असताना जखमी किंवा आजारी अवस्थेत मनुष्यवस्ती जवळ आढळल्यामुळे त्यांचे बचावकार्य पीपल फॉर अ‍ॅनिमलचे कौस्तुभ गावंडे यांनी केले आहे. पण, सदर पक्ष्याच्या छायाचित्राची पुष्टी करण्यासाठी पक्षीतज्ज्ञ डॉ. राजू कसंबे, डॉ. सचिन रानडे, शशांक नगराळे यांच्यासोबत चर्चा केली असता त्यांनी सदर पक्षी हा अल्पवयीन हिमालयीन गिधाड आहे, यावर एकमत दिले.
 
 
Bor Tiger Reserve: Himalayan Vulture हिमालयीन गिधाड या पक्ष्याचे शास्त्रीय नाव जिप्स हिमालयेंसिस असे आहे. मुख्यतः हिमालयीन गिधाडांचा अधिवास हा हिमालयातील उंच पर्वतरांगांमध्ये वर्षभर असतो. हिवाळ्यातील प्रचंड थंडीमुळे अल्पवयीन गिधाडे ही मध्य भारतात येतात. थंडी कमी झाल्यानंतर फेब्रुवारीच्या शेवटी हिमालयाकडे परततात. पण यातील काही अल्पवयीन गिधाडे ही अन्नाच्या शोधात व तापमानाचा अंदाज न आल्याने भरकटतात. तर काहींचा उपासमारीने मृत्यू देखील होतो. या नोंदीमुळे बोर व्याघ्र प्रकल्प जैवविविधतेच्या दृष्टीने फार महत्त्वाचे झाले आहे.
 
 
यापूर्वी मेळघाटात घेतली गेली नोंद
हिमालयीन गिधाड हे हिमालय अन् तिबेटच्या भागात आढळणारे सर्वात मोठे गिधाड आहे. यापूर्वी हिमालयीन गिधाड अस्वस्थ अवस्थेत मेळघाटात दिसल्याची नोंद आहे. नुकत्याच फेब्रुवारी महिन्यातही हिमालयीन गिधाड मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आढळून आले होते, असे अमरावती जिल्ह्याचे मानद वन्य जीवरक्षक डॉ. जयंत वडतकर यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0