‘धुरंधर २’चा १० दिवसांत १,२०० कोटींचा टप्पा पार

29 Mar 2026 11:34:18
मुंबई
Dhurandhar 2 बॉलीवूडमधील बहुचर्चित ‘धुरंधर २’ या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. रणवीर सिंग, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन, राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांच्या दमदार अभिनयामुळे चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
 

Dhurandhar 2 
१९ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवसापासून विक्रमी कमाई करत अनेक जुन्या बॉक्स ऑफिस रेकॉर्ड्सना मागे टाकले. प्रदर्शित होऊन दहा दिवस उलटल्यानंतरही चित्रपटाची कमाई स्थिर राहिल्याचे चित्र दिसत आहे. आठवड्याच्या दिवसांत थोडी घट दिसून आली असली, तरी वीकेंडला प्रेक्षकांची गर्दी पुन्हा वाढताना दिसली.
व्यापार विश्लेषकांच्या माहितीनुसार, Dhurandhar 2  चित्रपटाने दुसऱ्या शनिवारी तब्बल ₹62.85 कोटींची कमाई केली, जी आदल्या दिवसाच्या तुलनेत ५० टक्क्यांहून अधिक वाढ दर्शवते. एकूण १० दिवसांत चित्रपटाची भारतातील निव्वळ कमाई ₹778.77 कोटींवर पोहोचली असून एकूण देशांतर्गत कमाई ₹930.44 कोटी झाली आहे. परदेशातून मिळालेल्या ₹296 कोटींच्या उत्पन्नासह ‘धुरंधर २’ची जागतिक कमाई ₹1,226.44 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.आदित्य धर दिग्दर्शित हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’चा सिक्वेल आहे. ‘धुरंधर: द रिव्हेंज’ ही कथा हमजा अली माझारी या भारतीय गुप्तहेराभोवती फिरते. लयारी गँगमध्ये घुसखोरी करून दहशतवादाचा नायनाट करण्याचे त्याचे मिशन या भागात अधिक तीव्र आणि नाट्यमय पद्धतीने उलगडते. सिक्वेलमध्ये हमजा आपल्या शत्रूंना पराभूत करून अंडरवर्ल्डमध्ये स्वतःचे वर्चस्व कसे निर्माण करतो, याचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. तसेच, जसकिरत सिंग या त्याच्या भूतकाळातील आयुष्यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे.चित्रपटाची दमदार कथा, तगडी स्टारकास्ट आणि भव्य अ‍ॅक्शन सीक्वेन्समुळे ‘धुरंधर २’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून आगामी दिवसांतही त्याची कमाई जोरात राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0