अवैध रेतीसाठा : प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

29 Mar 2026 22:19:36
प्रशासनाचा अंदाज ३०० ब्रास साठा जप्त
मालकाचा दावा ८०-९० ब्रास : तपास सुरू

पुसद, 
शहरातील वसंतनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात Illegal sand case अवैध रेतीचा साठा आढळून आल्याने महसूल व पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वसंतनगर परिसरातील सहारा पार्कमधील डोंगरे लेआऊटमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध साठवणूक केल्याची माहिती उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांना मिळाली. त्यावरून उपविभागीय अधिकार्‍यांनी नायब तहसीलदार वैभव खाडे, मंडळ अधिकारी मयूर मस्के, तलाठी कामराज चौधरी व निरंजन वानखेडे या महसूल व पोलिस यंत्रणेने संयुक्त कारवाई करून अवैधपणे साठवून ठेवलेला रेतीचा साठा जप्त केला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून आली.
 

reti
 
प्राथमिक पंचनाम्यानुसार, संबंधित ठिकाणी अंदाजे ३०० ब्रास इतका रेतीसाठा आढळून आला आहे. मात्र, साठा जप्त करण्यात आलेल्या अब्दुल राजीक अब्दुल रौफ यांनी साठा केवळ ८० ते ९० ब्रास असल्याचा दावा करत, तो घरबांधणीसाठी आणलेला असल्याचे स्पष्टीकरण माध्यमांशी बोलताना केले. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात रेतीसाठा शहरात साचलेला असताना संबंधित नजरेतून तो कसा सुटला, हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात इतका मोठा साठा निर्माण होणे आणि त्याकडे दुर्लक्ष होणे, ही बाब प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करणारी ठरत आहे.
 
 
Illegal sand case  हे प्रकरण आता उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांच्या पातळीवर गेले असून, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत साठ्याची अचूक मोजणी येणार आहे. त्यानंतर साठा वैध की अवैध याबाबत अंतिम निष्कर्ष काढून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तथापि, या कारवाईतून केवळ साठा जप्तीपर्यंतच मर्यादित भूमिका राहणार की संबंधितांवर गुन्हे दाखल करून व्यापक स्तरावर कारवाई केली जाणार, याबाबत स्पष्टता अद्याप नाही. तसेच, स्थानिक पातळीवर कोणाचा पाठिंबा होता याचाही तपास होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. पुसद शहरात वाढत चाललेल्या अवैध रेती उत्खनन व साठवणुकीमुळे पर्यावरणीय हानीबरोबरच शासनाच्या महसुलालाही फटका बसत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने कठोर व पारदर्शक कारवाई करणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. अन्यथा, अशा कारवाया केवळ औपचारिक राहण्याची भीती व्यक्त जात आहे.
Powered By Sangraha 9.0