स्त्री हीच सृष्टीची आधारशिला” – मातृसंस्कार समागमात जितेंद्रनाथ महाराजांचे प्रभावी मार्गदर्शन

29 Mar 2026 21:00:56
शेगाव :
Jitendranath Maharaj bविश्वमांगल्य सभेच्या वतीने आयोजित दोन दिवसीय विदर्भस्तरीय मातृसंस्कार समागमचा भव्य प्रारंभ शेगाव येथील श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये उत्साहात झाला. या समागमाचे उद्घाटन देवनाथ पीठाचे आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना महाराजांनी स्त्रीशक्तीचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “स्त्री ही केवळ एक व्यक्ती नसून ती अन्नपूर्णा, दुर्गा, सरस्वती आणि भारतमातेचे साक्षात रूप आहे. संपूर्ण सृष्टीचा आधार आणि वंशपरंपरेची वाहक ही स्त्रीच आहे.” त्यांनी स्पष्ट केले की, समाज, कुटुंब, राष्ट्र आणि विश्वाच्या उन्नतीचा पाया स्त्रीच्या संस्कारांवर उभा आहे.
 
 
Jitendranath Maharaj
 
महाराजांनी आपल्या प्रभावी भाषणात सांगितले की, आई हीच घरातील खऱ्या अर्थाने संस्कारांची जननी असून तिच्या हातूनच उत्तम व्यक्तिमत्त्वांची निर्मिती होते. “राजकारणी, मंत्री देश चालवतात; पण खरे राष्ट्रनिर्माते घरातील आईच असते,” असे ते म्हणाले. रघुवंश, भोसले वंश यांसारख्या महान परंपरा घडविण्यामागे मातृशक्तीचे योगदान असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यावेळी त्यांनी आधुनिक समाजातील स्त्रीबाबत होणाऱ्या दुर्लक्षावरही भाष्य करत चिंता व्यक्त केली. “आजच्या काळात स्त्रीच्या सामर्थ्याचा योग्य सन्मान होत नाही, ही दुर्दैवी बाब आहे. मातृस्वरूपाचे चिंतन आणि तिच्या सन्मानाची जाणीव समाजात पुन्हा जागवणे गरजेचे आहे,” असे त्यांनी सांगितले.
 
 
Jitendranath Maharaj bसमागमाचे वैशिष्ट्य म्हणजे परंपरा, प्रगती आणि परिपक्वता यांचा सुंदर संगम असल्याचे सांगत, या दोन दिवसांत मातृसंस्कार, कुटुंब व्यवस्थापन, संस्कृती संवर्धन आणि समाजनिर्मिती या विषयांवर मार्गदर्शन होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
कार्यक्रमाला विदर्भातील विविध भागातून महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. मातृशक्तीच्या जागृतीसाठी आणि संस्कारक्षम समाज निर्मितीसाठी हा समागम प्रेरणादायी ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. प्रास्ताविक प्रांताध्यक्ष मधुरा लेंडे यांनी केले तर संचालन चिंचोलकर मॅडम यांनी केले स्वागतपर मनोगतामध्ये सभेच्या लोकप्रतिनिधी जनसंपर्क अभियानाच्या प्रांत संयोजिका डॉक्टर अपर्णाताई कुटे यांनी शिबिराचा उद्देश मातुसंस्कार समागमाचा उद्देश आपल्या मनोगत आतून विशद केला
Powered By Sangraha 9.0