बोलंगीर,
mla-fires-bullet-in-air : ओडिशाच्या बोलंगीर जिल्ह्यातील टिटलागढ येथे रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान हवेत गोळीबार केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार नवीन जैन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्हिडिओमध्ये आमदारांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (पीएसओ), प्रेमचंद नाग, हे जैन यांना पिस्तूल चालवण्यास मदत करताना दिसत आहेत. कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांना नंतर निलंबित करण्यात आले.
शस्त्र जप्त
बोलंगीर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (एसपी), हिमांशू भूषण बेहरा म्हणाले, "एफआयआर दाखल करण्यात आला असून शस्त्र जप्त करण्यात आले आहे. वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू केली जात आहे."
पिस्तूल खरे नव्हते, आमदारांचे म्हणणे
ही घटना शुक्रवारी संध्याकाळी टिटलागढ शहरात रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान घडली. एका व्हिडिओमध्ये स्थानिक आमदार पिस्तूल चालवताना दिसत आहेत. जैन यांनी दावा केला की ते पिस्तूल खरे नव्हते. भाजप आमदाराने असाही दावा केला आहे की, त्यांनी सभेत उपस्थित असलेल्या रामभक्तांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी हवेत गोळी झाडली होती आणि आरोप केल्याप्रमाणे कोणालाही घाबरवण्याचा त्यांचा हेतू नव्हता.
सौजन्य: सोशल मीडिया
बीजेडीची अटकेची मागणी
पोलिसांनी सांगितले की, आमदारावर सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण केल्याबद्दल भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम १२५ आणि शस्त्र कायद्याच्या कलम २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरोधी पक्ष बिजू जनता दलाने (बीजेडी) शनिवारी जैन यांच्या कृतीबद्दल त्यांच्या अटकेची मागणी केली होती.