मुंबई,
navi-mumbai-airport-new-schedule : नवी मुंबई, ठाणे आणि रायगडमधील प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. IndiGo ने नव्याने उभारलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मोठ्या प्रमाणावर उड्डाणे सुरू करण्याची तयारी पूर्ण केली आहे. २९ मार्च २०२६ ते २३ एप्रिल २०२६ या कालावधीत कंपनी ३० पेक्षा अधिक नवीन मार्ग सुरू करणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना मुंबईच्या वाहतूक कोंडीत अडकण्यापासून मोठा दिलासा मिळणार आहे.
या नव्या योजनेनुसार नवी मुंबई विमानतळ देशातील जवळपास सर्व प्रमुख शहरांशी थेट जोडले जाणार आहे. अयोध्या, वाराणसी, पाटणा यांसारख्या धार्मिक शहरांपासून कोलकाता, चंदीगड, श्रीनगर, विशाखापट्टणम, राजकोट, बागडोगरा आणि कन्नूर यांसारख्या महत्त्वाच्या शहरांपर्यंत थेट उड्डाणे उपलब्ध होणार आहेत. या विस्तारानंतर इंडिगो दर आठवड्याला ४०० हून अधिक उड्डाणे चालवणार असून प्रवाशांना प्रवासासाठी भरपूर पर्याय मिळणार आहेत.
विशेष म्हणजे गुजरातमधील औद्योगिक शहरांवरही कंपनीने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. भावनगर आणि नवी मुंबईदरम्यान दररोज दोन थेट उड्डाणे सुरू झाली आहेत. तसेच २३ एप्रिलपासून जामनगरसाठीही थेट सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे अहमदाबाद, वडोदरा, सूरत, राजकोट, भावनगर आणि जामनगर ही सहा मोठी शहरे आता नवी मुंबईशी थेट जोडली जाणार आहेत.
याशिवाय गोवा, कोल्हापूर, बेळगाव, इंदूर, भोपाळ, देहरादून, तिरुपती, तिरुवनंतपुरम, श्रीनगर, पाटणा, रायपूर अशा अनेक शहरांसाठीही नियमित उड्डाणे सुरू होणार आहेत. काही मार्गांवर दररोज सेवा असेल, तर काही ठिकाणी आठवड्याच्या ठराविक दिवशी उड्डाणे चालवली जाणार आहेत.
प्रवाशांच्या सोयीसाठी इंडिगोने तिकीट बुकिंगही सुरू केले आहे. प्रवासी कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा मोबाईल अॅपच्या माध्यमातून सहज तिकीट आरक्षित करू शकतात. या नव्या सेवेमुळे नवी मुंबई विमानतळ देशातील महत्त्वाचे हवाई केंद्र बनण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.