पवन सिंह वादाच्या भोवऱ्यात

29 Mar 2026 12:44:44
मुंबई
Pawan Singh भोजपुरी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता पवन सिंह पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी त्याच्या चित्रपट किंवा गाण्यांमुळे नव्हे, तर वैयक्तिक आयुष्याशी संबंधित वादामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे. हरियाणवी अभिनेत्री अंजलि राघव यांनी केलेल्या आरोपांनंतर हरियाणा महिला आयोगाने पवन सिंह यांना नोटीस बजावली आहे.
 

Pawan Singh controversy 
मिळालेल्या माहितीनुसार, अंजलि राघव यांनी महिला आयोगाकडे तक्रार दाखल करत पवन सिंह यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केला आहे. त्यांच्या तक्रारीत त्यांनी नमूद केले की, काही महिन्यांपूर्वी लखनऊ येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान पवन सिंह यांनी स्टेजवर त्यांना अयोग्य पद्धतीने स्पर्श केला. या घटनेचा व्हिडिओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला, ज्यामुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का बसल्याचा दावा त्यांनी केला आहे.हा संपूर्ण प्रकार ऑगस्ट २०२५ मधील असल्याचे सांगितले जात आहे. २९ ऑगस्ट रोजी लखनऊ येथे झालेल्या कार्यक्रमात अंजलि राघव सादरीकरण करत असताना पवन सिंह स्टेजवर उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी अंजलिच्या कंबरेला चुकीच्या पद्धतीने हात लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आणि पवन सिंह यांच्यावर टीकेची झोड उठली होती.वाद वाढल्यानंतर ३१ ऑगस्ट Pawan Singh  रोजी पवन सिंह यांनी सार्वजनिकरित्या माफी मागितली होती. मात्र, हा वाद तेथेच थांबला नाही. अंजलि राघव यांनी नंतर एक व्हिडिओ शेअर करत या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली आणि इंडस्ट्रीपासून दूर राहण्याचा इशाराही दिला होता. त्यांनी असा आरोपही केला की, संबंधित व्हिडिओ मुद्दाम व्हायरल करण्यात आला, ज्यामुळे त्यांच्या प्रतिमेला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न झाला.या प्रकरणाची दखल घेत हरियाणा महिला आयोगाने पवन सिंह यांना नोटीस जारी केली असून, २ एप्रिल रोजी फरीदाबाद येथे सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणामुळे भोजपुरी चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली असून, पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0