पुणे
Pune Zilla Parishad राज्य सरकारच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करत पुणे जिल्हा परिषदेला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. या स्पर्धात्मक मूल्यमापनात जिल्हा परिषदेला २०० पैकी तब्बल १९६.२५ गुण मिळाले असून, प्रशासनाच्या डिजिटल परिवर्तनातील ही मोठी कामगिरी मानली जात आहे.
मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या कार्यक्रमात राज्यातील विविध शासकीय कार्यालयांच्या कार्यक्षमतेचे सात महत्त्वाच्या निकषांवर मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये अधिकृत संकेतस्थळ, ‘आपले सरकार’ प्रणाली, ई-ऑफिस, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सअॅप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता व ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर तसेच भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) यांचा समावेश होता. या सर्व निकषांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत पुणे जिल्हा परिषद अव्वल ठरली
या यशाबद्दल मुंबईतील सह्याद्री सभागृहात आयोजित समारंभात मुख्यमंत्री यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांचा सन्मान करण्यात आला. या यशामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासनिक कार्यपद्धतीत झालेल्या डिजिटल बदलांना राज्यस्तरावर मान्यता मिळाली आहे.
पुणे जिल्हा परिषदेने Pune Zilla Parishad नागरिकाभिमुख आणि पारदर्शक प्रशासनासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. ‘इंटिग्रेटेड वर्क्स मॅनेजमेंट सिस्टीम’, ‘स्पंदन’, ई-लॉटरी, ‘सिस्टम ऑफ पेन्शन इलस्ट्रेशन’ यांसारख्या डिजिटल प्रणालींमुळे सेवा अधिक वेगवान आणि सुलभ झाल्या आहेत. तसेच क्यूआर कोड आधारित कर संकलन प्रणाली आणि स्मार्ट डॅशबोर्डमुळे निर्णयप्रक्रिया अधिक परिणामकारक बनली आहे. ‘पुणे झेडपी संवाद’ या एआय-आधारित व्हॉट्सअॅप चॅटबॉटद्वारे नागरिकांना २४x७ सेवा आणि माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. ‘आपले सरकार’ प्रणालीअंतर्गत बहुतेक सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये जाण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. याशिवाय, ‘सेवाकर्मी’ कार्यक्रमातही जिल्हा परिषदेची ‘विशेष प्रशंसनीय’ म्हणून निवड झाली आहे, ज्यामुळे सेवा गुणवत्ता, कर्मचारी कार्यक्षमता आणि नागरिक समाधान या बाबींमध्येही उत्कृष्ट कामगिरीची नोंद झाली आहे. या यशाबद्दल जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी सामूहिक प्रयत्नांचे श्रेय घेतले असून, भविष्यातही नागरिकांना अधिक पारदर्शक, जलद आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. डिजिटल प्रशासनाच्या माध्यमातून पुणे जिल्हा परिषद राज्यातच नव्हे तर देशात आदर्श मॉडेल ठरण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.